राजस्थानच्या हनुमानगढ जिल्ह्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर लावल्याप्रकरणी जमावाने तरुणाला मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आणि काही वेळातच त्याने प्राण सोडले. याबाबत पोलिसांनी अधिक तपास करत माहिती घेतली.
गेल्या काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या हनुमानगढ जिल्ह्यामधल्या एका गावामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर प्रकरणी सुरु असलेल्या वादाने चांगलाच पेट घेतला. त्यामुळे ओबीसी समाजाच्या काही जणांनी या दलित युवकाला अमानुष मारहाण केल्याचं वृत्त जनसत्ताने दिलं आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या या २१ वर्षीय युवकाने प्राण सोडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमानगढच्या किकरालिया गावाचा रहिवासी असलेला विनोद बामनिया हा भीम आर्मीचा सदस्य होता. त्याच्यावर ५ जून रोजी ओबीसी समाजाच्या काही लोकांनी हल्ला केला. ज्यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर विनोदला जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र दोन दिवसांतच त्याचं निधन झालं.
पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणात विनोदच्या परिवाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दोघांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एका व्यक्तीचं नाव अनिल सिहाग असून दुसरी व्यक्ती राकेश सिहाग आहे. या दोघांविरोधात पोस्टर फाडल्याप्रकरणी आणि मारहाण केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. या दोघांनी मारहाण करत असतानाच जातीय वक्तव्य केलं असल्याचंही या एफआयआरमध्ये लिहिलं आहे.
यापूर्वीही विनोद आणि त्याच्या परिवारावर हल्ला झाल्याची तक्रार त्याने पोलिसांत दाखल केली होती.