तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दलित समाजातील लोकांच्या धर्मांतरणासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. दलित समाजातील व्यक्तींचं धर्मांतर मोठ्या प्रमाणात होत असेल त्यासाठी आपण स्वत:ला दोषी ठरवलं पाहिजे कारण आपण त्यांचं संरक्षण करण्यास कमी पडत आहोत, असं मत राव यांनी व्यक्त केलं आहे. दलितांना जो सन्मान दिला जात नाही तो त्यांना धर्मांतर केल्यावर मिळतो, असंही राव यांनी म्हटलं आहे. रविवारी कामारेड्डी येथील एका कार्यक्रमादरम्यान भाषण देताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
“जर दलित सामाजातील लोक ख्रिश्चन धर्म स्वीकारत असतील तर त्यासाठी आपण स्वत:ला दोषी ठरवलं पाहिजे. आपण त्यांचं संरक्षण करण्यात कमी पडतो. जेव्हा हे लोक धर्मांतर करतात तेव्हा त्यांना तो मान दिला जातो जो दलित असल्याने आपण देत नाही. मी स्वत: हिंदू आहे. मात्र दलितांना आजही गरिबीला तोंड देत अनेक संकटांचा समाना करावा लागतोय, हे पाहून फार दु:ख होतं,” असं राव यांनी म्हटलं आहे.
If Dalits are converting to Christianity, it’s our fault that we’re unable to protect them. When they convert to Christianity, they’re getting respect denied to them as Dalit. I’m a Hindu & I feel bad when I see that Dalits are still suffering due to poverty: Telangana CM (20.6) pic.twitter.com/BF0CON9aLX
— ANI (@ANI) June 23, 2021
आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घेऊन गरीब आणि दलितांना मदत करुन त्यांना या गरिबीमधून बाहेर आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असंही राव यांनी म्हटलं आहे.
प्रसारमाध्यमांवरही हल्लाबोल
माध्यमं करोनाबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत आणि त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, असा आरोपही राव यांनी सोमवारी वारंगल येथील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना केला होता. प्रसारमाध्यमं चुकीच्या बातम्यांना महत्व देत असल्याचा आरोप करतानाच राव यांनी आपण पॅरासिटामॉल आणि अॅण्डीबॉडीज वाढवण्याच्या गोळ्या खाऊन दोन दिवसात करोनावर मात केल्याचं सांगितलं. माध्यमं लोकांना घाबरवत आहेत. अशा प्रकारे विनाकारण भीती पसरवण्याची काय गरज आहे?, असा प्रश्नही राव यांनी उपस्थित केला.
“माध्यमं खरी परिस्थिती चुकीच्या पद्धतीने मांडत आहेत. करोना नसतानाही सरकारी रुग्णालयांमध्ये जागा मिळत होती का? डॉक्टर कधीच रुग्णांना उपचार नाकारत नाहीत. कारण त्यांना माहित आहे की गरीब फक्त सरकारी रुग्णालयांमध्येच उपचार घेऊ शकतात. त्यामुळे ते रुग्णांना जमिनीवरच बसवतात आणि त्यांचे उपचार करतात. मात्र ही माध्यमं फोटो काढतात आणि सांगतात की रुग्णांना सरकारी रुग्णालयांमध्ये जमिनीवर झोपायला लागतं,” अशी टीका राव यांनी केली.