आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीची चौकशी करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नेमलेली समिती बेकायदा असल्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णय़ाविरोधात बीसीसीआय सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. बीसीसीआयने शुक्रवारी हा निर्णय घेतला. त्याचबरोबर जगमोहन दालमिया हेच तूर्त बीसीसीआयच्या हंगामी अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार असल्याचेही स्पष्ट झाले. एन. श्रीनिवासन यांना तूर्ततरी बीसीसीआयच्या अध्यक्षपदापासून दूर ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बीसीसीआयच्या कार्यकारिणीची शुक्रवारी होणारी नियोजित बैठक रद्द करण्यात आली.
बीसीसीआयने नेमलेल्या समितीने श्रीनिवासन यांचे जावई आणि चेन्नई सुपर किंग्जचे सहमालक गुरुनाथ मयप्पन तसेच राजस्थान रॉयल्सचे सहमालक राज कुंद्रा यांना क्लिन चीट दिली होती. त्यामुळे श्रीनिवासन पुन्हा एकदा मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा हातात घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, सध्या तरी श्रीनिवासन अध्यक्षपदी परतणार नसून, दालमियाच अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. आयपीएलच्या नियामक समितीच्या बैठकीलाही श्रीनिवासन उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती मिळाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा