पीटीआय, सिमला
हिमाचल प्रदेशच्या कुलू जिल्ह्यामध्ये मंगळवारी ढगफुटी होऊन काही घरांचे व शेतजमिनीचे नुकसान झाले. यासंबंधी माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन पूल आणि काही गुरे वाहून गेल्याचीही भीती आहे. ढगफुटीमुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे, तसेच भुंतर-गडसा रस्त्याचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. अंतर्गत भागातील काही रस्तेही बंद झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूल अधिकारी घटनास्थळी पोहोचले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मलाणा धरणाचा दरवाजा नादुरुस्त झाल्यामुळे धरणातून पाणी सोडले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर कुलू जिल्हा प्रशासनाने सोमवारीच पर्वती नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्यास सांगितले होते.

स्थानिक हवामान खात्याने हिमाचल प्रदेशच्या १२ पैकी आठ जिल्ह्यांमध्ये २६ आणि २७ जुलैसाठी ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’ जारी केला असून दरड कोसळणे, अचानक पूर येणे, भूस्खलन आणि नदीची पातळी वाढणे याबद्दल सतर्क राहण्यास सांगितले आहे.

ओडिशात २७ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

हवामान खात्याने संपूर्ण ओडिशा राज्यात २७ जुलैपर्यंत अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये मंगळवारी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने मंगळवार आणि बुधवारसाठी ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’ जारी केला आहे. गजपती, गंजम, पुरी, मलकानगिरी, कोरापुट आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मंगळवारी सात ते २० सेंमी पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.