इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचारामुळे देशाची प्रतिमा खराब होत असून सर्वच पक्षांनी हा हिंसाचार थांबवून शांतता प्रस्थापनेसाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते अधिररंजन चौधरी यांनी शनिवारी येथे केले.विरोधकांच्या इंडिया या आघाडीतील २१ खासदारांचे शिष्टमंडळ शनिवारी सकाळी इंफाळमध्ये दाखल झाले. मणिपूरमधील सद्यस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्याच्या घेण्याच्या उद्देशाने हे शिष्टमंडळ येथे आले आहे. त्यांचा हा दौरा दोन दिवसांचा आहे.
वांशिक हिंसाचारातील पीडितांची व्यथा जाणून घेण्यासाठी हे खासदार विविध ठिकाणच्या मदत छावण्यांना भेटी देणार आहेत. चौधरी यांनी पत्रकारांना सांगितले की, मणिपूरमधील घटनांकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. येथील हिंसाचार थांबवून लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्याची गरज आहे. हा प्रश्न समजून घेण्यासाठी आम्ही हिंसाचार पीडितांची भेट घेणार आहोत.या शिष्टमंडळाने चुराचांदपूर भागाला भेट दिली. काँग्रेसचे लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई यांच्या नेतृत्वाखालील एका अन्य शिष्टमंडळाने चुराचांदपूरच्या डॉन बॉस्को शाळेतील मदत छावणीला भेट दिली.