Sutandra Chatterjee road accident: पश्चिम बंगालमध्ये महिला सुरक्षित नसल्याचे अनेक प्रकरणे समोर येत असताना आता एका २७ वर्षीय नृत्यांगणेचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यात रविवारी रात्री झालेल्या अपघातात नृत्यागंणा आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या प्रमुख सुतंद्रा चॅटर्जी यांचा मृत्यू झाला. त्या पश्चिम बंगालच्या चंद्रनगर येथील राहणाऱ्या होत्या. कामानिमित्त बिहारच्या गया येथे जात असताना रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र. २ वर त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. सुतंद्र चॅटर्जी वाहनात पुढच्या सीटवर बसल्या होत्या. त्यांच्याबरोबर वाहनात असलेले दोन सहकारी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी अपघातग्रस्त झालेल्या दोन्ही वाहनांना जप्त केले आहे.
ओव्हरटेक करताना झाला अपघात
दुर्गापूर-आसनसोलचे पोलीस आयुक्त सुनील कुमार चौधरी यांनी सांगितले की, ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात सदर अपघात घडला. “आम्ही सीसीटीव्ही चित्रण तपासले आहे. ज्यामध्ये एक सफेद रंगाची गाडी चॅटर्जी यांच्या गाडीच्या पुढे जात असताना धडक देते. चॅटर्जी यांच्या गाडीचा पाठलाग केला जात होता. यात हा अपघात घडला. चॅटर्जी यांच्या सहकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार आम्ही तपास सुरू केला आहे.”
सुतंद्रा चॅटर्जी यांचे सहकारी मिंडू मंडल यांनी या प्रकरणी FIR दाखल केला आहे. त्यांनी आरोप केला की, सफेद रंगाच्या गाडीत बसलेल्या लोकांनी चॅटर्जी यांच्याकडे पाहत अश्लील इशारे केले. त्या गाडीने दहा किलोमीटरपर्यंत आमच्या गाडीला अनेकदा धडक दिली. तर वाहनाचे चालक राजदेव शर्मा यांनी सांगितले की, त्या गाडीत पाच लोक बसले होते. ते लागोपाठ हॉर्न वाजवत होते आणि अश्लिल इशारे करत होते. ते आधी ओव्हरटेक करायचे मग पुन्हा आमच्या गाडीला पुढे जाऊ द्यायचे. आम्ही त्यांच्यापासून पिच्छा सोडविण्याचा खूप प्रयत्न केला. आम्हाला भीती होती की, ते आम्हाला लुटतील.
कुटुंबातील एकटी कमावती व्यक्ती
मंडल पुढे म्हणाले की, सफेद रंगाच्या गाडीत बसलेले लोक नशेत असल्याचे दिसत होते. अपघात झाल्यानंतर ते लोक तिथून पळून गेले. आम्ही कसेबसे गाडीच्या बाहेर आलो, मात्र चॅटर्जी मॅडम रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या. सुतंद्रा यांच्या वडिलांचे कर्करोगामुळे निधन झाले होते. त्यानंतर त्या कुटुंबातील एकट्या कमावत्या व्यक्ती होत्या. त्या आजारी आई आणि दोन आज्यांचा एकटीने सांभाळ करत होत्या.