Stedsans Owner Couple Fled to Gwatemala : पृथ्वीवरील वातावरणाचा बिघडलेला समतोल, प्रदूषणाचं वाढतं प्रमाण आणि ढासळत चाललेली परिस्थिती यासंदर्भात वेळोवेळी चर्चा होत असते. त्याबाबत चिंता आणि संभाव्य उपायही केले जातात. यावरच उपाय म्हणून पूर्णपणे पर्यावरणपूरक अनुभव देणारं रिसॉर्ट सुरू केल्याचा दावा करणारं एक दाम्पत्य तब्बल १५८ बॅरल्स मानवी मैला मागे सोडून दुसऱ्या देशात फरार झाल्याची बाब उघड झाली आहे. डेन्मार्क ते ग्वाटेमाला व्हाया स्वीडन असा या दाम्पत्याचा प्रवास झाला असून त्यांनी ‘पर्यावरणीय गुन्हा’ केल्याचा दावा स्थानिक प्रशासनाने केला आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

फ्लेमिंग हॅन्सन व मेट हेलबीक असं या दाम्पत्याचं नाव होतं. हे दाम्पत्य मूळचं डेन्मार्कचं आहे. नऊ वर्षांपूर्वी म्हणजे २०१६ मध्ये हे दाम्पत्य स्वीडनला स्थलांतरीत झालं होतं. स्वीडनमध्ये त्यांनी ‘स्टेडसन्स’ नावाचं एक रिसॉर्ट सुरू केलं. पूर्णपणे पर्यावरणपूरक जीवनाचा अनुभव देणारं हे रिसॉर्ट असल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच, या रिसॉर्टच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचाही संदेश हे दाम्पत्य देत असे. त्यांच्या या रिसॉर्टचं अनेक इन्फ्लुएन्सर्सनीही कौतुक केलं होतं. या रिसॉर्टमध्ये पूर्णपणे लाकडी बनावटीच्या एकूण १६ खोल्या होत्या.

पण अचानक हे दाम्पत्य गायब झाल्याचं स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आलं. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या या रिसॉर्टच्या मागे तब्बल १५८ बॅरल भरून मानवी मैला ठेवण्यात आला होता. रिसॉर्टमधलं सांडपाणीही थेट जवळच्या जंगलात सोडलं जात असल्याचंही उघड झालं. रिसॉर्टमधल्या पाळीव प्राण्यांना त्यांनी असंच सोडून दिलं. त्यात काही प्राण्यांचा देखभालीअभावी लागलीच मृत्यू झाला तर काही प्राण्यांना कोणत्याही व्यवस्थेशिवाय असंच जंगलात सोडून देण्यात आलं होतं. हे दाम्पत्य स्वीडनमधून ग्वाटेमालामध्ये पळून गेल्याचं नुकतंच उघड झालं आहे.

का फरार झालं दाम्पत्य?

स्थानिक तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या रिसॉर्टचा व्यवसाय दिवाळखोरीत गेला होता. डेन्मार्कमध्येही त्यांच्यावर कोट्यवधींचा कर थकवल्याचा आरोप होता. स्वीडनमध्ये त्यांच्यावर जवळपास ४ लाख ७० हजार युरोंचा कर थकवल्याचा आरोप आहे. त्यामुळे अचानक हे सगळं सोडून हे दाम्पत्य ग्वाटेमालाला फरार झाल्याचं आता निष्पन्न झालं आहे.

संकेतस्थळावर दिलं स्पष्टीकरण

फ्लेमिंग हॅन्सन व मेट हेलबीक यांनी स्टेडसन्सच्या संकेतस्थळावर या सगळ्या प्रकाराबाबत त्यांची भूमिका मांडली आहे. “स्टेडसन्स आम्ही बराच काळ व्यवस्थित चालवलं होतं. पण आम्हाला लवकरच हे समजलं की जो देश जगात सर्वाधिक कर आकारणाऱ्या देशांपैकी एक आहे आणि जिथलं प्रशासन हे अजिबात सहकार्य करत नाही, अशा देशात मनापासून काम करणाऱ्या नवउद्योजकांसाठी एखादा चांगला उपक्रम राबवणं अशक्य काम आहे. आम्हाला फक्त हे जग सुंदर बनवण्याच्या प्रयत्नाचा भाग व्हायचं होतं”, असं त्यांनी संकेतस्थळावर लिहिलं आहे.

ग्वाटेमालामध्ये नवीन हॉटेल!

दरम्यान, डेन्मार्कहून स्वीडन आणि स्वीडनहून ग्वाटेमालाला फरार झाल्यानंतर या दाम्पत्यानं तिथेही एक नवीन हॉटेल सुरू केल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे डेन्मार्क आणि स्वीडनमधील प्रशासनाकडून या प्रकरणाचा तपास करून करवसुलीबाबत पावलं उचलली जात आहेत.