श्रद्धा वालकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी आफताब पूनावाला याची अलीकडेच नार्को आणि ‘पॉलीग्राफ लाय डिटेक्टर’ चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीनंतर आफताबला तिहार कारागृहात ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, आफताब दररोज नवनवीन खुलासे करत आहे. आपण रागाच्या भरात श्रद्धाचा खून केल्याची कबुली आफताबने दिली आहे.

मृत श्रद्धाने त्याला सोडण्याची धमकी दिली होती. तसेच तिने अन्य एका तरुणासोबत ‘डेटवर’ गेली होती. त्यामुळे आफताब श्रद्धावर संतापला. त्यानंतर हा वाद वाढत गेल्यानंतर आफताबने श्रद्धाचा खून केला.

हेही वाचा- श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यासाठी कोणत्या हत्यारांचा वापर केला? नार्को चाचणीत आफताबचे धक्कादायक खुलासे

‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, आफताब पोलिसांना सांगितलं की, श्रद्धा वालकर डेटिंग अॅप ‘बंबल’वर भेटलेल्या एका तरुणासोबत डेटवर गेली होती. १७ मे रोजी संध्याकाळी श्रद्धा डेटवर गेली होती. ती १८ मे रोजी दुपारी मेहरोली येथील फ्लॅटवर परतली. श्रद्धा घरी परत आल्यानंतर दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. या वादानंतर आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला. यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले.

हेही वाचा- श्रद्धाचे ३५ तुकडे केल्यानंतर आफताबने १०० तास पाहिला जॉनी डेप आणि अँबर हर्ड यांचा खटला; कारण…

‘अमर उजाला’ने दिलेल्या वृत्तानुसार, आफताबने दिल्ली पोलीस आणि तपास यंत्रणांना हत्येसाठी वापरण्यात आलेलं हत्यार आणि श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधण्याचे आव्हान दिलं आहे. त्याने श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकड्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावल्याबाबत विश्वास व्यक्त केला आहे. खुनाची कबुली देताना आफताब पुढे म्हणाला की, “होय, मी श्रद्धा वालकरचा खून केला आहे. तिच्या मृतदेहाचे तुकडे आणि खून करण्यासाठी वापरलेलं हत्यार शोधून दाखवा, असं आव्हान तुम्हाला देतो.” यापूर्वी आफताबने त्याच्या गुरुग्राम कार्यालयाजवळील झाडीत खुनासाठी वापरलेलं हत्यार फेकल्याचे सांगितलं होतं.

Story img Loader