गुवाहाटी येथे १९७६ मध्ये आणीबाणीच्यावेळी झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अधिवेशनात प्रियरंजन दासमुन्शी यांच्याशिवाय संजय गांधी यांच्यावर स्पष्टपणे टीका करणारे ए.के.अँटनी हेच एक नेते होते, असे विकिलिक्सने अमेरिकी राजनैतिक संवादातील उघड केलेल्या माहितीत स्पष्ट झाले आहे. त्या काळात संजय गांधी यांचा राजकीय आलेख उंचावलेला होता.
विकिलिक्सच्या केबल्समध्ये म्हटले आहे की, त्यावेळी ए.के.अँटनी हे केरळचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी गुवाहाटीच्या अधिवेशनात संजय गांधी यांना पाठिंबा देण्यास नकार दिला होता. संजय गांधी यांनी देशासाठी किंवा पक्षासाठी काय त्याग केला, असा  सवाल अँटनी यांनी केला होता.
गुवाहाटी अ.भा.काँग्रेस समितीचे अधिवेशन व युवक काँग्रेसची गुप्त बैठक याविषयी केबल्समधून उघड झालेल्या माहितीनुसार संजय हे त्याकाळात मुख्य आकर्षण होते व काँग्रेस पक्षसंघटनेच्या पुनरूज्जीवनासाठी ते काम करीत होते व त्यांच्या मातोश्री इंदिरा गांधी यांच्यानंतर काँग्रेसमधले दुसऱ्या क्रमांकाचे ते नेते होते. ते अजूनही नंबर दोन आहेत, संजय व त्यांचे सहकारी त्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत, असे २६ नोव्हेंबर १९७६ च्या केबलमध्ये म्हटले होते.
अमेरिकेच्या त्यावेळच्या भारतातील राजदूतांनी असे कळवले होते की, संजय गांधी व युवक काँग्रेस यांचा एवढा गाजावाजा होऊनही युवक काँग्रेसची सदस्य संख्या फार वाढली नव्हती.नवीन युवक काँग्रेस तसेच संजय गांधी यांच्यावर टीका करण्यात ए.के.अँटनी आघाडीवर होते. पश्चिम बंगालचे काँग्रेस नेते प्रियरंजन दासमुन्शी यांनीही संजय गांधी यांच्यावर टीका केली होती. १९७७ मध्ये काँग्रेसजनांमधील अस्वस्थता व संघटनेचा निष्प्रभपणा ही समस्या गंभीर बनली. गुवाहाटी अधिवेशनाची परिणती ही काँग्रेसमध्ये अस्वस्थता व युवक काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास वाढवण्यात झाली, नंतरच्या काळात पक्ष संघटनेत लोकशाही कमी होत गेली.
पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग
विकिलिक्सने अलीकडेच प्रकाशित केलेल्या जागतिक नकाशात पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा भाग असल्याचे दाखविले आहे.
या नकाशात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा उल्लेखच करण्यात आलेला नाही.
वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मात्र यासाठी १९७५ मध्ये अस्तित्वात असणाऱ्या आंतरराष्ट्रीय सीमांचा वापर करून नकाशा तयार केला असल्याचे विकिलिक्सने आपल्या संकेतस्थळावर म्हटले आहे.