Cowin App Data Leak : आरोग्य मंत्रालयाच्या कोविन पोर्टलवर असलेली नागरिकांची माहिती (डेटा) टेलिग्राम या सोशल मीडियावर लिक झाल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. यावरून देशाची सायबर सुरक्षा संस्था ‘भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथका’ने (सीईआरटी-इन) या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला असून भारतीयांची माहिती फुटल्याचे आढळलेले नाही, असे केंद्राने म्हटले आहे.दरम्यान, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याबाबत फायनान्शियल एक्सप्रेस डिजिटल इकॉनॉमी कॉन्क्लेव्ह 2023 मध्येही डेटा लिकचा दावा फेटाळून लावला आहे.
“भारतीय नागरिकांची वैयक्तिक माहिती मेसेजिंग प्लॅटफॉर्म टेलिग्रामवर लिक झाल्याचे वृत्त खोटे होते. टेलिग्रामवरून प्राप्त झालेली माहिती ही कोविनवरून प्रसारित झालेली नाही. टेलिग्रामवर जो डेटा मिळाला तो कोविनचा नव्हता”, अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली.
हेही वाचा >> गोपनीय माहितीच्या संरक्षणास सरकार असमर्थ, काँग्रेसची टीका
“कथितपणे लीक झालेला डेटा टेलिग्रामच्या मालकीच्या डेटाबेसमधून मिळण्याची शक्यता आहे. आज मी भारत सरकारच्या वतीने सांगत आहे की ते कोणत्याही सरकारी अॅपवरून माहिती लिक झालेली नाही. तसंच कोविन डेटाबेसमधून तर नक्कीच नाही”, असंही ते म्हणाले.
“टेलिग्रामवरून लिक झालेला डेटा आता गायब झाला आहे. तो मोठ्या प्रमाणावर बनावट डेटा होता. CERT-In ने केलेल्या तपासणीत यातील अनेक नोंदी बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे”, असंही पुढे त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा >> ‘कोविन’वरील भारतीयांची वैयक्तिक माहिती सुरक्षित, वृत्त खोडसाळ असल्याचे केंद्राचे स्पष्टीकरण
कोविन पूर्णपणे भेदणे अशक्य, ‘क्लाउडसेक’चा दावा
माहिती चोरणाऱ्यांना कोविन पोर्टल किंवा बॅकएंड डेटाबेसमध्ये संपूर्ण प्रवेश मिळणे अशक्य आहे, असा दावा ‘क्लाउडसेक’ या सायबर सुरक्षा संस्थेने केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविन पोर्टलवरील माहिती फुटल्याचे वृत्त आधीच फेटाळले आहे. टेलिग्राम डेटा आणि पूर्वी नोंदवलेल्या घटना यांच्या एकमेकांशी मिळत्याजुळत्या क्षेत्रावर आधारित आम्ही असे गृहीत धरतो की, काही असुरक्षित लॉगइन माहितीवरून रुग्णांची माहिती चोरण्यात आली असे ‘क्लाउडसेक’ने आपल्या अहवालात म्हटले आहे.