पीटीआय, बंगळुरू
सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयावरून वाद सुरू असतानाच राज्य घटना धर्म आधारित आरक्षणाला परवानगी देत नसल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी व्यक्त केले. अशा प्रकारचे आरक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या तीन दिवसीय बैठकीच्या समारोपप्रसंगी पत्रकारांना ते संबोधित करीत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेत धर्मावर आधारित आरक्षण स्वीकारलेले नाही. कोणीही असे करत असेल तर तो घटनेच्या विरोधात जाईल, असे होसबाळे म्हणाले.
भाजपअंतर्गत बाबीत हस्तक्षेप नाही
भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाच्या नियुक्तीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर संघ पक्षाअंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत नसल्याचे होसबाळे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर केवळ संघाचे नव्हे तर संपूर्ण हिंदू समाजाचे यश असल्याचे होसबाळे म्हणाले.
आक्रमक मानसिकता असलेले लोक भारतासाठी धोका
महाराष्ट्रात औरंगजेबाच्या समाधीवरून उद्भवलेल्या वादावर बोलताना त्यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्यात आले असल्याचे होसबाळे म्हणाले. आक्रमक मानसिकता असलेले लोक भारतासाठी धोका असल्याचे सांगतानाच जे भारतीय मूल्यांचे समर्थन करतात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरजही त्यांनी प्रतिपादित केली.
संघटित हिंदू समाज निर्मितीचा संकल्प
● राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या समारोपप्रसंगी जागतिक शांती आणि समृद्धतेसाठी संघटित हिंदू समाज निर्मिती करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
● या सभेला सरसंघचालक मोहन भागवत,सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, भाजपचे सरचिटणीस बी.एल. संतोष आणि ३२ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न संघटनांचे प्रमुख उपस्थित होते.
● धर्मावर आधारित आत्मविश्वासपूर्ण, संघटित आणि सामूहिक जीवनाद्वारेच हिंदू समाज आपली जागतिक जबाबदारी प्रभावीपणे पार पाडू शकेल, असे ठरावात म्हटले आहे.
अविभाजित आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राने मुस्लिमांसाठी धर्मावर आधारित आरक्षण लागू करण्याचे यापूर्वी केलेले प्रयत्न उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले आहेत. अशा आरक्षणाच्या तरतुदी न्यायालयांनी नाकारल्या आहेत.– दत्तात्रेय होसबाळे, सरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ