लोक जनशक्तीचे पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना त्यांचीच मुलगी आशा पासवान यांनी आंदोलनाची धमकी दिली आहे. पासवान यांच्या ‘अंगठा छाप’वाल्या वक्तव्यावर आशा या नाराज असून त्यांनी रामविलास पासवान यांना राबडी देवींची माफी मागावी अन्यथा त्यांच्याविरोधात आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.

पासवान यांनी शुक्रवारी आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना काही अंगठा छाप नेते मुख्यमंत्री होतात, असे म्हटले होते. आपल्या वडिलांनी माजी मुख्यमंत्री राबडी देवींवर निशाणा साधताना संपूर्ण महिला समाजाचा अपमान केल्याचे आशा देवी यांनी म्हटले आहे.

आशा पासवान इथेच थांबल्या नाहीत. त्या म्हणाल्या, माझे वडील रामविलास पासवान यांनी बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची माफी मागितली पाहिजे. नाहीतर मला माझ्या वडिलांविरोधातच आंदोलन करावे लागेल. मी पक्षाच्या कार्यालयाबाहेर धरणे करेन. त्यांच्या हाजीपूर मतदारसंघात त्यांच्याविरोधात प्रचार करेन.

माझी आई अंगठा छाप होती म्हणूनच तिला सोडले होते, असेही आशा यांनी म्हटले. विशेष म्हणजे आशा यांचे पती साधू पासवान यांनी नुकताच राजदचे सदस्यत्व घेतले आहे.

तर दुसरीकडे जीतनराम मांझी यांनी रामविलास पासवान यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. पासवान यांच्या वक्तव्यानंतर बिहारमध्ये आता ‘अंगठा छाप’वरून नवीन राजकारण सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Story img Loader