Crime News : मुलीने आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या इच्छेविरोधात लग्न केल्याने वडिलांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ऋषीराज जैसवाल असं आत्महत्या करणाऱ्या ४९ वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. ऋषीराज यांचा मृतदेह त्यांच्या घरातील बेडरुममध्ये आढळून आला. पहाटे एकच्या सुमारास कुटुंबियांनी गोळी झाडल्याचा आवाज ऐकला आणि त्यानंतर ते धावले पण ऋषीराज यांचा मृत्यू झाला.
ही घटना नेमकी कुठे घडली?
ऋषीराज जैसवाल यांच्या आत्महत्येची ही घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर या ठिकाणी घडली आहे. मुलीने मनाविरुद्ध लग्न केल्याने ऋषीराज हे तणावाखाली होते. त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं. या प्रकरणी अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्ण लालचंदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार १५ दिवसांपूर्वी ऋषीराज यांच्या मुलीने त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मुलासह पळून गेली आणि तिने त्याच्याशी लग्न केलं. ती पळून गेल्यानंतर त्याबाबतची तक्रार देण्यात आली होती. ती इंदूर या ठिकाणी सापडली. पण तिने तिच्या नवऱ्याशी कायदेशीर पद्धतीने लग्न केल्याची बाब समोर आली. या सगळ्या घटनेनंतर मुलीचे वडील म्हणजेच ऋषीराज तणावाखाली होते. त्यांना घडलेला प्रकार मुळीच आवडला नाही असं कृष्ण लालचंदानी यांनी सांगितलं.
सुसाईड नोटमध्ये काय उल्लेख?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषीराज यांनी एक सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात ते म्हणतात, “हरिता तू अतिशय चुकीचं वागली आहेस. तू जे केलंस त्याबद्दल तुला आणि तुझ्या नवऱ्याला दोघांना गोळ्या घातल्या पाहिजेत. पण मी माझ्या मुलीला कसा मारेन? आर्य समाजात अशा पद्धतीने लग्न मान्य नाही. तरीही कोर्टाने माझ्या मुलीला लग्नाला संमती कशी काय दिली? या घटनेमुळे माझं कुटुंब आणि मी उद्ध्वस्त झालो आहोत. कुणीही माझ्या वेदना समजू शकत नाही.” असं म्हणत ऋषीराज यांनी स्वतःवर गोळी झाडली आणि आयुष्य संपवलं.
ऋषीराज यांनी केली होती जावयाला मारहाण
ऋषीराज जैसवल हे चंद्रबदानी भागात मेडीकल चालवत होते. त्यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी राहात होते. त्यांच्या मुलीने दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्न केल्याने ते दुखावले होते. समाजात आपली बदनामी झाली या भावनेतून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषीराज गेल्या काही दिवसांपासून तणावात आणि तितकेच अस्वस्थही होते. दरम्यान ऋषीराज यांच्या मुलीशी लग्न करणारा मुलगा जेव्हा ऋषीराज यांच्या घरी आला तेव्हा ऋषीराज यांनी त्यांच्या जावयाला म्हणजेच हरिताच्या नवऱ्याला मारहाण करुन बाहेर काढलं होतं अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. तसंच प्रत्यक्षदर्शींनी हेदेखील सांगितलं की त्या मुलाला इतकं मारलं होतं की तो बेशुद्ध झाला होता. त्याला लोकांनी रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी आत्महत्या आणि मारहाण अशा दोन्ही प्रकरणांत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरु आहे.