मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे विश्वासू सल्लागार व प्रखर रशियन राष्ट्रवादी विचारवंत अलेक्झांडर डुगिन यांच्या मुलीचा मॉस्कोच्या बाहेरील भागात एका मोटारीत झालेल्या स्फोटात मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.

‘मॉस्को रीजन इन्व्हेस्टिगेटिव्ह कमिटी’ने दिलेल्या माहितीनुसार २९ वर्षीय डारिया डुगिन यांचा मोटारीत ठेवलेल्या बॉम्बचा शनिवारी रात्री स्फोट झाला. हा डुगिन यांच्या हत्येचा कट असल्याचा संशय आहे.

डुगिन हे युक्रेनमध्ये रशियन सैन्याने केलेल्या कारवाईचे कडवे समर्थक आहेत. त्यांची कन्याही राष्ट्रवादी रशियन विचारांची समर्थक होती. रशियातील राष्ट्रवादी दूरचित्रवाणी वाहिनी ‘झारग्राड’वर ती अनेकदा आपले विचार आक्रमकपणे मांडत असे. वडिलांप्रमाणेच ती रशियाच्या पश्चिमेशी चाललेल्या संघर्षांच्या भूमिकेस जोरदार पािठबा देत असे. डारिया तिच्या वडिलांसोबत एका सांस्कृतिक कार्यक्रमानंतर घरी परतत असताना हा स्फोट झाला. खरे तर या मोटारीत तिचे वडील डुगिन बसणार होते.

युक्रेनमधील रशियासमर्थक फुटीरतावादी ‘डोनेतेस्क पीपल्स रिपब्लिक’चे अध्यक्ष डेनिर पुशिलिन यांनी यामागे युक्रेनच्या दहशतवाद्यांचा हात असून डुगिन यांच्या हत्येचा यामागे कट असल्याचा आरोप केला. याप्रकरणी संशयिताची अद्याप ओळख पटलेली नाही.