Tahawwur Rana And David Coleman Headley Connection: मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहव्वुर हुसेन राणाला अमेरिकेतून भारतात परत आणण्याचि प्रक्रिया सुरू झाली आहे. या घटनेमुळे आता राणाचा जवळचा सहकारी डेव्हिड कोलमन हेडलीबाबतही सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. हे दोघेही २००८ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख सूत्रधार आहेत. या बॉम्बस्फोटात २० सुरक्षा दलाचे कर्मचारी आणि २६ परदेशी लोकांसह १६६ लोकांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान एफबीआयने अटक केल्यानंतर सुमारे १६ वर्षे भारत सरकार राणाचा अमेरिकेकडून ताबा मिळावा यासाठी प्रयत्न करत होते. अखेर भारताला यामध्ये यश आले आहे. अमेरिकेने राणाच्या प्रत्यार्पणासाठी परवानगी दिल्यानंतर त्याला भारतात आणण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि रॉ चे पथक अमेरिकेत पोहचले असून, तेथे राणाला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
तहव्वुर राणाची प्रत्यार्पण प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्याचा सहकारी आणि पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन नागरिक असलेल्या डेव्हिड कोलमन हेडलीबाबतही चर्चा होऊ लागली आहे. हेडलीने २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात त्याची भूमिका होती, याबाबत आधीच कबुली दिली आहे. मात्र, मुंबई हल्ल्यांशी आणि एका डॅनिश वृत्तपत्रावर नियोजित हल्ल्याशी संबंधित आरोपांसाठी तो सध्या अमेरिकन तुरुंगात ३५ वर्षांची शिक्षा भोगत आहे.
कोण आहे डेव्हिड कोलमन हेडली?
डेव्हिड कोलमन हेडलीचा जन्म वॉशिंग्टन डीसीमध्ये झाला. दाऊद सय्यद गिलानी हे त्याचे जन्मनाव होते. त्याचा जन्म एक प्रसिद्ध पाकिस्तानी राजनयिक आणि प्रसारक सय्यद सलीम गिलानी आणि त्याची अमेरिकन पत्नी अॅलिस सेरिल हेडली यांच्या पोटी झाला. अमेरिकेत कायमचे स्थलांतरीत होण्यापूर्वी हेडलीने आपले सुरुवातीचे वर्ष जीवन पाकिस्तानातील एका बोर्डिंग स्कूलमध्ये घालवले. अमेरिकेत गेल्यानंतर त्याने फिलाडेल्फिया येथील त्याच्या कुटुंबाच्या पबमध्ये बारमन म्हणून काम केले.
लष्कर-ए-तैयबाशी संबंध
पुढे हेडलीने पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंध प्रस्थापित केले. १९९८ मध्ये, पाकिस्तानातून अमेरिकेत हेरॉइनची तस्करी केल्याबद्दल त्याला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. सुटकेनंतर, हेडलीने यूएस ड्रग एन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशनबरोबर काम करण्यास सुरुवात केली आणि पाकिस्तानमध्ये गुप्तपणे देखरेख करण्याचे काम केले.
२६/११ हल्ल्यातील सहभाग
हेडली २००२ ते २००५ दरम्यान पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या किमान पाच प्रशिक्षण शिबिरांमध्ये सहभागी झाला होता. त्यानंतर, हेडली लष्कर-ए-तोयबाच्या कमांडर्सच्या सूचनेनुसार भारतात पाळत करण्यासाठी आला होता. २००८ मध्ये मुंबई हल्ल्यांपूर्वी तो पाच वेळा भारतात आला होता, अशी माहिती अमेरिकेच्या न्याय विभागाने दिली आहे.
अमेरिकेला सहकार्य
डेन्मार्कमध्ये पुढील हल्ले करण्यापूर्वी त्याला २००९ मध्ये अमेरिकेत अटक करण्यात आली. नंतर त्याला दहशतवादाच्या आरोपांमध्ये दोषी ठरवण्यात आले. तो अमेरिकेत ३५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. भारताने वारंवार त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे, परंतु अमेरिकन अधिकाऱ्यांनी त्याच्या सहकार्य कराराचा हवाला देत त्याचा प्रत्यार्पणास नकार दिला आहे.