मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी कुख्यात दाऊद इब्राहिम कराचीमधील उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या भागातच राहात असल्याचे एका खासगी वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनवरून समोर आले आहे. ‘सीएनएन-न्यूज१८’ या वाहिनीने हे स्टिंग ऑपरेशन केले.
कराचीमधील क्लिफ्टन या उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या भागात दाऊद राहतो, असे या स्टिंग ऑपरेशनमुळे स्पष्ट झाले. डी-१३, ब्लॉक ४, क्लिफ्टन असा त्याचा अधिकृत पत्ता आहे. या वाहिनीने पख्तूनमधील दोघांच्या साह्याने हे स्टिंग ऑपरेशन केले. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत. दाऊद पाकिस्तानातच असल्याचे अनेक पुरावे भारताकडून यापूर्वी पाकिस्तान सरकारला देण्यात आले आहेत. त्यामध्ये ज्या पत्त्यांचा उल्लेख आहे. त्यापैकीच एका पत्त्यावर दाऊद राहात असल्याचे स्टिंग ऑपरेशनमध्ये दिसले. भारताकडून दिलेल्या पुराव्यांमध्ये एकूण पाच पत्त्यांचा समावेश होता. त्या सर्व पाच पत्त्यांच्या ठिकाणी जाऊन स्टिंग करणाऱ्यांनी पाहणी केली. त्यापैकी क्लिफ्टन हाच भाग अतिसंरक्षित क्षेत्र म्हणून ओळखला जातो आणि तिथेच दाऊद वास्तव्याला आहे.
स्टिंग करणाऱ्यांनी कराचीतील पोलीस अधिकारी आणि दाऊदच्या घराबाहेर राहणारे सुरक्षारक्षक यांच्याशीही संवाद साधला. या सर्वांनी दाऊद कराचीतच राहात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला, असे वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा