पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला कमकुवत करण्यासाठी देशातील धार्मिक नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आणि महत्त्वाच्या चर्चवर हल्ले करण्याचा कट कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमने रचला होता, असा दावा राष्ट्रीय तपास संस्थेने(एनआयए) केला आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, ‘एनआयए’कडून दाऊदच्या गँगमधील दहा गुंडांविरोधात शनिवारी आरोपपत्र दाखल करण्यात येणार असून, मोदी सरकार सत्तेत आल्यावर देशात लगेच सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचे काम या गुंडांना देण्यात आले होते, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासूनच म्हणजेच २०१४ पासूनच ‘डी कंपनी’ने संघ नेते आणि चर्चेसना निशाणा बनविण्याचा कट रचला होता. याच कटाचा भाग म्हणून २ नोव्हेंबर २०१५ रोजी गुजरातमधील डाव्या विचारसरणींच्या दोन नेत्यांची हत्या करण्यात आली होती. मारेकऱयाला पकडण्यात यश देखील आले होते. याकूब मेमनच्या फाशीचा बदला घेण्यासाठी या नेत्यांना ठार केल्याचा दावा मारेकऱयाने केला होता. पुढे चौकशी दरम्यान, एनआयएच्या अधिकाऱयांना मोठ्या कटाचा उलगडा झाला. देशातील धार्मिक नेते, स्वयंसेवक संघातील नेते आणि चर्चेसवर हल्ला चढविण्याच्या विचारात ‘डी-कंपनी’चे सदस्य होते, अशी माहिती समोर आली.