अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील एका नातेवाईकाची उत्तर प्रदेशमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या नातेवाईकाचे नाव निहाल खान असून तो मुंबईतील भायखळा परिसरात राहात होता. मिळालेल्या माहितीनुसार एका लग्नसमारंभासाठी निहाल खान हे उत्तर प्रदेशच्या जलालाबादमध्ये गेले होते. या लग्नसमारंभादरम्यान त्यांची मानेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
निहाल खान हा दाऊन इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचा मेहुणा होता. निहाल खान यांची बहीण रिझवाना हसन इक्बाल कासकरची पत्नी आहे. इक्बाल कासकर हा खंडणीच्या प्रकरणात २०१८ सालापासून तळोजा येथील मध्यवर्ती कारागृहात आहे.
पळून जाऊन केलं होतं लग्न
मिळालेल्या माहितीनुसार जलालाबादचे शहराध्यक्ष शकील खान हे निहालचे मेहुणे आहेत. निहाल खान हा शकील खान यांच्या भाचीसोबत पळून गेला होता. त्यानंतर साधारण १५ दिवस या दोघांचा शोध घेतला जात होता. मात्र कोणतीही कायदेशीर कारवाई न करता परस्पर चर्चेतून हा वाद सोडवण्यात आला होता. मात्र शकील खान यांचा भाऊ कामील खान यांची मात्र निहाल यांच्यावरील नाराजी कायम होती.
हत्येचं नेमकं कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार निहाल खान यांना १५ फेब्रुवारी रोजी विमानाने जलालाबादला जायचे होते. मात्र वेळेवर पोहोचू न शकल्यामुळे विमान निघून गेले. त्यानंतर त्यांनी रस्तेमार्गाने जलालाबादला जाण्याचा निर्णय घेतला होता. शेवटी निहाल खान लग्नसमांभात पोहोचले होते. मात्र या लग्नसमारंभात कामील खान यांनी निहाल खान यांच्यावर गोळ्या झाडल्या. यातच निहाल खान यांचा मृत्यू झाला.
कामील खानविरोधात खुनाचा गुन्हा
दम्यान, या प्रकरणी कामील खान यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निहाल यांची पत्नी रुस्कार यांनी तशी तक्रार दिल्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. निहाल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे. दरम्यान, निहाल खान यांच्याविरोधात वेगवेगळ्या आरोपांखाली अनेक गुन्हे दाखल आहेत.