मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार कु ख्यात गुंड दाऊद इब्राहिम याने शरणागती पत्करण्याची तयारी दर्शवली पण केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेने त्याला नकार दिला, असा गौप्यस्फोट दिल्लीचे माजी पोलीस उपमहानिरीक्षक नीरजकुमार यांनी येथे केला. दरम्यान आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असे नीरजकुमार यांनी म्हटले आहे.
नीरजकुमार हे एक पुस्तक लिहीत असून त्यासंदर्भात त्यांनी हे विधान केले. दरम्यान ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी यापूर्वीच असे सांगितले होते की, दाऊदने शरण येण्याचा प्रस्ताव दिला होता, पण तो शरद पवार यांनी फेटाळला होता. मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकेत ३०० जण ठार झाले होते.
नीरजकुमार यांनी हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या माहितीत सांगितले की, दाऊद इब्राहिम याने जून १९९४ मध्येच शरणागतीची तयारी दर्शवली होती, आपण दाऊदशी तीनदा बोललो होतो, तो शरणागतीस तयारीत होता पण जर आपण भारतात परत आलो तर विरोधी टोळ्या आपल्याला ठार करतील अशी भीती दाऊदला वाटत होती. नीरजकुमार म्हणाले की, दाऊदला त्याची विरोधकांकडून ठार मारले जाण्याची भीती वाटत होती, केंद्रीय अन्वेषण विभाग तुझ्या सुरक्षेची काळजी घेईल असे आपण सांगितले होते पण केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेने या प्रस्तावावार आपल्याला माघार घेण्यास सांगितले.
नीरजकुमार हे १९९४ मध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषणमध्ये काम करीत होते. त्यावेळी मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटांच्या तपासाची सूत्रे त्यांच्याकडे होती.
नीरजकुमार यांच्या गौप्यस्फोटावर सीबीआयचे माजी संचालक विजय रामा राव यांनी सांगितले की, दाऊद इब्राहिमने शरणागती पत्करण्याचा कुठलाही प्रस्ताव दिलेला नव्हता व जर तसे असते तर त्याची माहिती आपल्याला असती. पण तसे काही झालेले नव्हते. स्वत नीरजकुमार यांनीही याचा इन्कार केला. आपण असे बोललोच नव्हतो. सदर वार्ताहराने आपल्या अनौपचारिक गप्पांतील विधानांना वेगळाच रंग दिला असा खुलासा शनिवारी त्यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा