कुविख्यात गुंड दाऊद इब्राहिम याला लवकरच अटककरून भारतात आणण्यात येईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. मात्र, त्यासाठीचा नेमका कालावधी किंवा निर्धारीत वेळ काही त्यांनी सांगितला नाही.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजनाथ म्हणाले की, दाऊदला लवकरच अटककरून कोणत्याही परिस्थितीत त्याला भारतात आणले जाईल. तो एक आंतरराष्ट्रीय गुंड आहे. त्याला अटक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांची मदत घ्यावी लागेल. दाऊदच्या ठावठिकाणा संबंधी मिळालेले सर्व पुरावे आम्ही पाकिस्तानकडे सोपवले आहेत.
दाऊद पाकिस्तानातच दडून बसला असल्याचा दावा एका वृत्त वाहिनीने स्टिंग ऑपरेशनने केला होता. या स्टिंग ऑपरेशनच्या मदतीने भारत सरकारने पाकिस्तानकडे दाऊदला भारताच्या ताब्यात सोपविण्याची मागणी केली आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वी ‘इसिस’ने एक व्हिडिओ जारी करून भारताला धमकी दिली होती. त्यावर बोलताना राजनाथ यांनी भारताला ‘इसिस’पासून कोणताही धोका नसल्याचे म्हटले. सर्व सुरक्षा यंत्रणां अलर्टवर असून देशातील सर्व मुस्लिम देखील ‘इसिस’च्या विरोधात आहेत. भारतातील कोणताही मुस्लिम ‘इसिस’च्या कारवायांचे समर्थन करत नाही. त्यामुळे अशा दहशतवादी संघटनांना देश घाबरू शकत नाही, असेही राजनाथ पुढे म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा