लष्कराच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे मंगळवारी दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीर भेटीवर आगमन झाले. दहशतवादाविरोधात संपूर्ण भारत एकत्रित असून, त्यांच्या कट-कारस्थानांना आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा निर्धार डॉ. सिंग यांनी भेटीवेळी व्यक्त केला.
किश्तवारमधील ८५० मेगावॉटच्या जलविद्युत प्रकल्पाच्या कोनशीलेचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. सोमवारी दुपारी लष्कराच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात आठ जवान शहीद झाले, तर १९ जण गंभीर जखमी झाले. काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांतील हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा नियोजित दौरा रद्द करण्यात येणार नसल्याचे पंतप्रधान कार्यालयाने सोमवारी संध्याकाळीच स्पष्ट केले होते. या हल्ल्याची जबाबादारी हिजबूल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.
पंतप्रधान जम्मू-काश्मीरमधील सीमेवरील जिल्ह्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेजही जाहीर करण्याची शक्यता आहे. क्वाझीगुंड ते बनिहाल दरम्यानच्या रेल्वेसेवेचा शुभारंभही मनमोहनसिंग यांच्या हस्ते बुधवारी होणार आहे.

Story img Loader