Catholic Bishops पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी नवी दिल्ली येथील सीबीसीआय केंद्र परिसरातील ‘कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडिया’च्या वतीने आयोजित केलेल्या नाताळ साजरा करण्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. भारतातील कॅथोलिक चर्चच्या मुख्यालयामध्ये होणाऱ्या अशा प्रकारच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांची उपस्थिती असण्याची ही पहिलीच वेळ होती. कार्डिनल, बिशप आणि चर्चमधील प्रमुख नेत्यांसह ख्रिश्चन समुदायातील प्रमुख नेत्यांशीही यावेळी पंतप्रधानांनी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतल्या कार्यक्रमात काय म्हणाले?
देशातील नागरिकांना आणि जगभरातील ख्रिश्चन समुदायाला नाताळच्या हार्दिक शुभेच्छा देताना पंतप्रधान म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मी केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांच्या निवासस्थानी ख्रिसमसच्या समारंभात सहभागी झालो होतो आणि आता बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया (सीबीसीआय)च्यावतीने आयोजित या कार्यक्रमात सर्वांबरोबर सहभागी होण्याचा सन्मान मला मिळतो आहे. कॅथोलिक सीबीसीआय च्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त होत असलेला हा विशेष कार्यक्रम आहे. या उल्लेखनीय टप्प्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी सीबीसीआय आणि त्यांच्याशी संबंधित सर्वांचे अभिनंदन केलं. यानंतर आता केरळमधल्या एका चर्च बिशपने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. दिल्लीत ते बिशप आणि ख्रिस्ती धर्मगुरुंचा सन्मान करतात आणि या ठिकाणी म्हणजेच केरळमध्ये सारं काही उद्ध्वस्त केलं जातं असं या धर्मगुरुंनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी एकीकडे बिशपचा आदर-सन्मान करतात, पण इथे ख्रिस्तजन्माचं प्रतीक म्हणून उभारलेले पाळणे उद्ध्वस्त करतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काय टीका होते आहे?
पलक्कड या ठिकाणी सरकारी शाळांमध्ये नाताळच्या उत्सवात अडथळा आणल्याच्या दोन घटना कशा घडल्या आणि त्याबाबत विश्व हिंदू परिषदेच्या तीन नेत्यांना चित्तूरमध्ये कशी अटक झाली हा संदर्भही त्यांनी दिला. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले पल्लकड या ठिकाणी जेव्हा नाताळचा समारंभ सुरु होता तेव्हा विद्यार्थी आणि शिक्षक यात सहभागी झाले होते. त्यावेळी विहिंपच्या तीन नेत्यांनी तुम्ही ख्रिसमच्या ऐवजी कृष्ण जन्माचा उत्सव का साजरा करत नाही असा सवाल केला. एवढंच नाही तर शिक्षकांनी सांताक्लॉजचा ड्रेस का घातला आहे? असाही सवाल त्यांनी केला आणि वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी या तिघांनाही अटक करावी लागली. अशा घटना घडतात तेव्हा मोदी कुठे असतात? असंही त्यांनी म्हटलं आहे. अशाच प्रकारची एक घटना सोमवारीही घडली आहे. दरम्यान या सगळ्याबाबत आता भाजपानेही प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपाचे केरळचे प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले?
भाजपाचे केरळ प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन म्हणाले पल्लकड मध्ये जी घटना घडली त्यानंतर दोषींना अटक करण्यात आली. आता त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत आहे. भाजपाचे ख्रिश्चन समुदायाशी सलोख्याचे संबंध आहेत. ते बिघडवण्याच्या कटाचा भाग म्हणून याकडे पाहतो आहोत.