बुलेट ट्रेनच्या भूमिपूजनानंतर भारतीय रेल्वेमध्ये क्रांतिकारी बदल होतील असे वक्तव्य केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केले आहे. एवढेच नाही तर, भारतात बुलेट ट्रेन सुरू होणार असल्याने रेल्वेत रोजगाराच्या संधीही निर्माण होतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पियूष गोयल यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेच्या विकासाच्या दृष्टीने निर्देश दिले आहेत. भारतीय वाहतूक क्षेत्राची व्याख्या बदलण्याचे आव्हान आमच्यावर आहे. यामुळे येत्या काळात रेल्वेमध्ये महत्त्वाचे बदल होताना दिसतील असेही गोयल यांनी स्पष्ट केले आहे.

१४ सप्टेंबरला अहमदाबादमध्ये देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे भूमीपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे हे या कार्यक्रमाला हजर असणार आहेत. या प्रकल्पासाठी जपानच्या जायका या संस्थेने ८८ हजार कोटींचे कर्ज दिले आहे. ०.१ टक्के दराने ५० वर्षांच्या मुदतीसाठी हे कर्ज भारताला देण्यात आले आहे. आत्तापर्यंत देशाला मिळालेले हे सर्वात स्वस्त कर्ज आहे अशीही माहिती पियूष गोयल यांनी दिली आहे.