पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा निषेध केल्यामुळे भाजपाचा नेता आणि बिकानेर अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष उस्मान गनीला पक्षातून दोन दिवसांपूर्वी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी त्याला पोलिसांनी अटक केली. उस्मान गनीवर शांतता भंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या बन्सवाडा येथे मुस्लीम समुदायाबाबत खेदजनक वक्तव्य केले होते, असा आरोप करून गनीने पंतप्रधान मोदींचा निषेध व्यक्त केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिकानेरच्या मुक्ता प्रसाद पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक धीरेंद्र शेखावत म्हणाले की, शनिवारी उस्मान गनीच्या घरी पोलिसांचे वाहन पाठविण्यात आले होते. त्यानंतर दुपारी उस्मान गनी पोलीस ठाण्यात पोहोचला. खबरदारीचा उपाय म्हणून उस्मान गनीला ताब्यात घेण्यात आले आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी उस्मान गनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विधान केले होते. त्यानंतर तो दोन दिवस दिल्लीत होता. शनिवारी तो परतताच त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

Video: “हा पक्ष एकट्या मोदींचा नाही, शेकडो मुस्लीम…”, भाजपा पदाधिकाऱ्याचं विधान; झाली हकालपट्टीची कारवाई!

धीरेंद्र शेखावत पुढे म्हणाले की, आम्हाला माहीत नव्हतं तो कोण आहे. पोलीस ठाण्यासमोर नाकाबंदी करण्यात आली होती. तिथे येऊन त्याने पोलिसांशी बाचाबाची केल्यानंतर आम्ही त्याला गजाआड टाकले. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५१ अनुसार उस्मान गनीवर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या तो तुरुंगात असून आम्ही त्याला अतिरिक्त न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सादर करणार आहोत. शांतता राखण्यासाठी किमान सहा महिन्यांची शिक्षा व्हावी, असा आमचा प्रयत्न असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मात्र उस्मान गनीच्या घरी पोलिसांनी आपले वाहन का पाठविले? याबाबत वरिष्ठ पोलीस निरक्षकांनी समाधानकारक उत्तर दिले नाही, अशी माहिती द इंडियन एक्सप्रेसने दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक राधेश्याम म्हणाले की, उस्मान गनीचा पंतप्रधानावरील टीकेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

उस्मान गनीने काय म्हटले होते?

न्यूज २४ जर्नलिस्ट या वृत्तवाहिनीशी बोलत असताना उस्मान गनीने पंतप्रधान मोदींच्या विधानाचा निषेध केला होता. “एक मुस्लीम म्हणून मला पंतप्रधानांच्या विधानाचा खेद वाटतो. मी जेव्हा भाजपासाठी मत मागायला समाजात जातो, तेव्हा मला पंतप्रधान मोदींच्या विधानाबाबत जाब विचारला जात आहे”, असं गनी त्या मुलाखतीमध्ये म्हटला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले होते?

२१ एप्रिल रोजी राजस्थानच्या बन्सवाडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेला संबोधित करताना म्हटले, “आधी जेव्हा त्यांचे (काँग्रेस) सरकार होते, तेव्हा ते म्हणाले की, देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. याचा अर्थ, तुमची संपत्ती एकत्र करून कुणाला वाटली जाणार? ज्यांचे अधिक मुलं आहेत, जे घुसखोर आहेत, त्यांना तुमची संपत्ती वाटली जाणार. तुमच्या मेहनतीचे पैसे अशाप्रकारे घुसखोरांना देणे तुम्हाला मान्य आहे का?”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Days after he criticised pm modi comments police detain ex head usman gani of bjps bikaner minority cell kvg
Show comments