कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमचा समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱया मुंबईतील एका उद्योगपतीची केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळे दिल्ली पोलिसांच्या चौकशीतून सुटका झाली असल्याचा आरोप माजी गृहसचिव आर.के.सिंह यांनी केला आहे.
भारतीय जनता पक्षात (भाजप) दाखल झाल्यानंतर काही दिवसांतच आर.के.सिंह यांनी काँग्रेसवर निशाणा साधत हा खळबळजनक आरोप केला आहे. आर. के. सिंग एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, दिल्ली पोलीस आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात मुंबईच्या एका बड्या उद्योगपतीची चौकशी करणार होते. परंतु, तो दाऊदचा माणूस असल्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांनी स्वत:च्या पदाचा वापर करत या उद्योगपतीची पोलिसांच्या चौकशीतून सुटका केली. तसेच थेट गृहमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे त्या उद्योपतीची दाऊदशी असलेल्या संबंधाबाबत सविस्तर चौकशीही पोलिसांना करता आलेली नाही आणि हाच उद्योगपती टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा देखील आरोपी आहे असेही आर.के.सिंग म्हणाले.
इतकेच नव्हे तर, दिल्लीत केंद्रीय गृहमंत्रीपदावर येताच शिंदेंनी दिल्लीतील पोलीस ठाण्यात आपल्या मर्जीतील पोलीस अधिकारी महत्वाच्या पदांवर असले पाहिजेत याची काळजीही त्यांनी घेतली. काही जणांच्या अनावश्यक बदल्याही केल्या असल्याचा आरोप आर.के.सिंग यांनी यावेळी केला.

Story img Loader