Daughters Beat Father in Morena: मध्य प्रदेशच्या मुरैना येथे हरेंद्र मौर्य यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्यांनी आत्महत्या केली असल्याचा दावा केला गेला. मात्र आता त्यांच्या मृत्यूपश्चात एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मौर्य यांच्या दोन मुली त्यांना अमानुष मारहाण करत असल्याचे दिसते. तसेच त्यांची पत्नीही या मारहाणीत सामील असून तिने मौर्य यांचे पाय पकडल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी हरेंद्र मौर्य यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. अंतिम अहवाल आल्यानंतरच ही आत्महत्या होती की हत्या? याबाबत निश्चित सांगता येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान व्हायरल व्हिडीओवर नेटिझन्स संताप व्यक्त करत आहेत.
हरेंद्र मौर्य हे इलेक्ट्रिशियनचे काम करत होते. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हरेंद्र आणि त्यांच्या पत्नीचे नेहमीच वाद होत असत. १ मार्च रोजी त्यांच्या दोन मुलींचे लग्न झाले. लग्नानंतर काही दिवसातच त्यांच्या पत्नीने सांगितले की, तिला हरेंद्रपासून वेगळे व्हायचे असून ती माहेरी राहू इच्छिते. पत्नीच्या या भूमिकेमुळे निराश झालेल्या हरेंद्र यांनी स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले. बराच वेळ जाऊनही हरेंद्र बाहेर न आल्यामुळे कुटुंबियांनी धावपळ केली. ज्यानंतर त्यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले.
हरेंद्र यांचा मृत्यू झाल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, सततच्या भांडणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी. तर त्यांच्या पत्नीच्या आई-वडिलांनी हरेंद्रच्या वडील आणि भावावर खूनाचा आरोप केला.
हरेंद्र मौर्य यांच्या मृत्यूबाबत संशय असतानाच आता एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हरेंद्र मौर्य यांना त्यांच्या दोन मुली आणि पत्नी अमानुष मारहाण करत असल्याचे दिसत आहे. हरेंद्र यांच्या पत्नीने त्यांचे पाय धरले आहेत. तर लहान मुलीने त्यांचे हात धरून ठेवल्याचे व्हिडीओत दिसत आहे. मोठी मुलगी लाकडी दांड्याने त्यांना मारहाण करत आहे. या दरम्यान लहान भाऊ मोठ्या बहिणीला अडविण्याचा प्रयत्न करतो, पण बहिण त्यालाही धमकावते.
व्हायरल होणारा व्हिडीओ १ फेब्रुवारीचा असल्याचे सांगितले जात आहे. सदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. अनेकांनी या मुलींना शिक्षा व्हावी, असे म्हटले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली चंदोरीया यांनी म्हटले की, हरेंद्र मौर्य यांच्या मृतदेहावर ग्वाल्हेर वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणी होत आहे. अंतिम अहवाल आल्यानंतर आम्ही कारवाई करू.