राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. भारतीय जनता पार्टीने अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमधून माघार घेतल्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी फडणवीस दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याने या निवडणुकीसंदर्भातील चर्चा दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाशी होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र फडणवीस यांच्या या दौऱ्याचं मुख्य कारण भाजपाची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक हे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. हिमाचल प्रदेशमध्ये येत्या १२ नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. तर ८ डिसेंबर रोजी निकाल जाहीर केला जाईल. हिमाचल प्रदेश या राज्यामधील बहुतांश प्रदेश हा डोंगराळ आहे. त्यामुळे हवामानाचा मुद्दा लक्षात घेता येथील निवडणूक कार्यक्रम अगोदर घोषित करण्यात आला आहे. याच घोषणेच्या पार्श्वभूमीवर आता भाजपाने निवडणुकीची तयारी सुरु केली असून त्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज सायंकाळी दिल्लीत पार पडणार आहे.

हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीची रणनिती ठरवण्याच्या दृष्टीने आजची भाजपाची केंद्रीय निवडणुक समितीची बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. हिमाचलमधील रणनिती आणि तिकीट वाटप यासंदर्भातील चर्चा या बैठकीमध्ये होणार आहे. महाराष्ट्रामधून केवळ देवेंद्र फडणवीस हे या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य आहेत. त्यामुळेच फडणवीस आज दिल्ली दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. सायंकाळी ही बैठक पार पडणार असली तर या दौऱ्यामध्ये फडणवीस इतर केंद्रीय नेत्यांना भेटण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

राज्यामध्ये शिवसेनेतील बंडखोर शिंदे गट आणि भाजपाच्या सरकारला नुकतेच १०० दिवस पूर्ण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच केंद्रीय नेतृत्वाबरोबर अंधेरी पोटनिवडणुकीबद्दल फडणवीस चर्चा करु शकतात असंही म्हटलं जात आहे. फडणवीस केंद्रीतील काही नेत्यांबरोबर महाराष्ट्रातील घडामोडी आणि संबंधित विषयांवर चर्चा करतील अशी माहिती समोर येत आहे.