दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांचा एका अनोळखी व्यक्तीने विनयभंग केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याबाबत स्वत: स्वाती मालीवाल यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. तसेच यावेळी आरोपीने त्यांना फरपटत नेल्याचंही त्या म्हणाल्या. गुरूवारी रात्री ३ वाजेच्या सुमारास एम्स रुग्णालयाजवळ ही घटना घडली.
हेही वाचा – दिल्ली सरकार विरुद्ध केंद्र वादावर सुनावणी पूर्ण;अधिक मोठय़ा घटनापीठाकडे देण्याची केंद्राची नवी मागणी
मालीवाल यांनी ट्वीट करत दिली माहिती
”काल रात्री उशिरा मी दिल्लीतील महिला सुरक्षेच्या स्थितीची पाहणी करत होते. यावेळी एका कार चालकाने मद्यधुंद अवस्थेत माझा विनयभंग केला. जेव्हा मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने माझा हात गाडीच्या खिडकीत बंद केला आणि मला फरपटत नेले. सुदैवाने मला कोणतीही इजा झाली नाही”, अशी माहिती स्वाती मालीवाल यांनी ट्वीट करत दिली. तसेच ”दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असेल, तर सामान्यांच्या परिस्थिती काय असेल?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
दिल्ली पोलिसांकडून आरोपी अटक
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून त्यांची गाडीदेखील जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलीस पुढील तपास करत आहे.