छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात मंगळवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) दोन कर्मचारी शहीद झाले तर दूरदर्शनच्या एका कॅमेरामनचा मृत्यू झाला. यावेळी दूरदर्शनचा कॅमेरा असिस्टंट या हल्ल्यातून सुदैवाने बचावला. हल्ला सुरु होता तेव्हा कदाचित आपलाही मृत्यू होईल अशी शक्यता वाटत असल्याने कॅमेरामनने आपल्या आईसाठी एक मेसेज रेकॉर्ड करुन ठेवला होता. व्हिडीओत असिस्टंट कॅमेरामन मोरमुकूट आपलं आईवरील प्रेम व्यक्त करताना दिसत असून, कदाचित आपण वाचणार नाही असं म्हणत आहे.

व्हिडीओत कॅमेरामन मोरमुकूट बोलताना दिसत आहे की, ‘एका रस्त्याने जात होतो. जवान आमच्यासोबत होते. अचानक नक्षलवाद्यांनी आम्हाला घेरलं. आई माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. कदाचित या हल्ल्यात मी मारला जाईन. परिस्थिती चांगली नाहीये. का माहित नाही पण मृत्यू समोर दिसूनही भीती वाटत नाहीये. वाचणं कठीण आहे. सहा ते सात जवान सोबत आहेत. चारही बाजूंनी घेरलं आहे’. ते बोलत असताना वारंवार गोळीबार सुरु असल्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत आहे.

मोरमुकूट यांच्यासोबत रिपोर्टर धीरज कुमार आणि कॅमेरामन अच्युतानंद साहू होते. बस्तर येथे निवडणूक कव्हर करण्यासाठी ते आले होते. नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी शहीद झाले तर अच्युतानंद साहू यांचाही मृत्यू झाला. सब इन्स्पेक्टर रुद्र प्रताप आणि असिस्टंट कॉन्स्टेबल मंगलू अशी शहीद कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

जखमी झालेल्या दोन जवानांना एअरलिफ्ट करुन रायपूरला नेण्यात आलं. दोघांची प्रकृती स्थिर आहे. कॉन्स्टेबल विष्णू नेतम आणि असिस्टंट कॉन्स्टेबल राकेश कौशल अशी जखमी जवानांची नावे आहेत.