उत्तर प्रदेशमधील कानपूर शहरात प्राप्तिकर विभागाच्या कर्मचाऱ्याचा मृतदेह चक्क १८ महिने घरात ठेवल्याचे समोर आले आहे. या अधिकाऱ्याचे नाव विमलेश दीक्षित असून ते कोमामध्ये गेल्याचे समूजन कुटुंबीयांनी त्यांचा मृतदेह घरात ठेवला आहे. विशेष म्हणजे विमलेश लवकर बरे व्हावेत म्हणून त्यांची पत्नी कुजलेल्या मृतदेहावर रोज गंगाजल शिंपडत होत्या. कानपूरमधील एका खासगी रुग्णालयाने त्यांना २२ एप्रिल २०२१ रोजीच मृत घोषित केले होते.
हेही वाचा >>> “दाखवायचे दात वेगळे आणि…” मोहन भागवतांच्या ‘त्या’ भेटीवर दिग्विजय सिंह यांची टीका, म्हणाले, “जोपर्यंत भागवत अखलाखच्या…”
मिळालेल्या माहितीनुसार मृत विमलेश दीक्षित मागील १८ महिन्यांपासून कार्यालयात न आल्यामुळे प्राप्तिकर विभागाकडून चौकशी करण्यात आली. त्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्याच्या आरोग्य विभाग पथकाची मदत घेतली. हे पथक पोलीस कर्मचारी आणि दंडाधिकारी शुक्रवारी (२३ सप्टेंबर) यांच्यासह रावतपूर भागातील दीक्षित यांच्या घरी पोहोचले. या पथकाने दीक्षित यांच्या घरी जाऊन अधिक चौकशी केली. त्यानंतर कुटुंबीयांनी दिक्षित अद्याप जिवंत असून ते कोमात असल्याचे सांगितले. शेवटी दीक्षित यांचा मृतदेह लाला लजपत राय (LLR) रुग्णालयात तपासणीसाठी नेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
हेही वाचा >>> भारताने संयुक्त राष्ट्रांसमोरच पाकिस्तानला सुनावलं; म्हणाले, “सीमेपलीकडील दहशतवाद…”
दरम्यान, तब्बल १८ महिने मृतदेह घरात ठेवल्यामुळे येथे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापन करण्यात आली आहे. दीक्षित यांचे कुटुंबीय ते कोमामध्ये गेल्याचे शेजाऱ्यांना सांगत असत. मिळालेल्या माहितीनुसार दीक्षित यांच्या पत्नी मानसिकदृष्ट्या अस्थिर आहेत. त्यांचे कुटुंबीय घरात ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जायचे, असे शेजाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान आरोग्य विभागाच्या पथकाने ताब्यात घेतलेला मृतदेह अत्यंत कुजलेल्या स्थितीत होता, असे सांगण्यात आले आहे.