Live in Partner Murder: लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराचा खून होण्याच्या घटना गेल्या काही वर्षांत वाढलेल्या आहेत. श्रद्धा वालकर प्रकरणानंतर लिव्ह-इनकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली. मात्र त्यानंतरही या घटना थांबलेल्या नाहीत. लखनऊमध्ये लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. प्रॉपर्टी डिलर म्हणून काम करणारी ही तरुणी शुक्रवारी लखनऊमधील पीजीआय परिसरात रस्त्यालगत जखमी अवस्थेत आढळून आली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनंतर तिला अपेक्स ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मृत तरुणीचे नाव गीता शर्मा असल्याचे सांगितले जाते. ज्या रस्त्यालगत ती बेशूद्ध अवस्थेत आढळली होती, तिथेच एका सोसायटीत ती राहत होती. तरुणीचा भाऊ लालचंदने गीता शर्माचा लिव्ह इन जोडीदार गिरीजा शंकरवर खूनाचा आरोप करत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपायुक्त पंकज सिंह यांनी सांगितले की, तरुणीच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या होत्या, अतिरिक्त रक्तस्त्राव होऊन तिचा मृत्यू झाला. या जखमा अपघातामुळे झाल्या होत्या की तिचा कुणी खून केला, याचा आम्ही तपास करत आहोत.

पोलिसांनी पुढे माहिती देताना सांगितले की, गीता शर्मा ही मूळची रायबरेली येथे राहणारी होती. प्रॉपर्टी डिलर म्हणून काम करणारी गीता पीजीआय परिसरात एका सोसायटीमध्ये राहत होती. गिरीजा शंकरने माझ्या बहिणीचा अपघात झाल्याची चुकीची माहिती आम्हाला दिली आणि आमची दिशाभूल केली, असा आरोप गीता शर्माचा भाऊ लालचंदने केला.

लालचंदने पुढे सांगितले की, गीता शर्माने १ कोटीचा आयुर्विमा काढला होता. ज्यामध्ये गिरीजा शंकर हा नॉमिनी होता. विम्याची रक्कम मिळविण्यासाठी माझ्या बहिणीचा खून झाला असावा, असा संशय त्याने व्यक्त केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dead body of women found on roadside in lucknow kin allege murder by live in partner kvg