हाँगकाँगमधील लोकशाहीवादी निदर्शकांना रस्त्यांवरून हटविण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू करण्याचे संकेत मिळाल्यामुळे मीरपूड बाळगलेल्या सशस्त्र पोलिसांचा निदर्शकांशी संघर्ष उडाला. आपल्याला पांगविण्यासाठी हवेत मीरपूड सोडून पोलीस अश्रुधुराचा वापर करतील, अशी भीती आंदोलकांना वाटत असल्यामुळे एकूणच वातावरण तंग होते. याआधीही गेल्या आठवडय़ात आंदोलकांवर हे अस्त्र उगारले होते.   
कोवलून जिल्ह्य़ातील माँगकोक परिसरात निदर्शकांचा पोलिसांसमवेत शनिवारी रात्रभर संघर्ष सुरू होता. आंदोलक आणि निदर्शकांनी अधिकाऱ्यांप्रति अपशब्द उच्चारून त्यांना भडकावले, तर आपल्यावर हल्ला करणाऱ्या जमावापासून संरक्षण करण्याकामी पोलीस अपयशी ठरल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आपल्याला हटविण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांशी संधान बांधल्याचेही आंदोलकांकडून सांगण्यात आले; परंतु सरकारने या आरोपांचा स्पष्टपणे इन्कार केला.
आंदोलकांनी रस्ते रोखून धरल्यामुळे शहरात विस्कळीतपणा आला असून त्यांनी आता आपापल्या घरी जावे, असे आवाहन वरिष्ठ नेते, मुख्याधिकारी लेऊंग चुन-यींग यांनी शनिवारी दूरचित्रवाणीवरून केले होते.
दरम्यान, लोकशाहीवादी नागरिकांच्या शांततापूर्ण निदर्शनांची संभावना ‘बेकायदा’ अशी करीत या निदर्शनांमुळे हाँगकाँगमध्ये अराजक माजेल, असा इशारा चीनने दिला आहे.
चीनमधील ‘पीपल्स डेली’ या सरकारी वृत्तपत्राने एक लेख प्रसिद्ध केला असून, त्यात या निदर्शनांची संभावना बेकायदा अशी केली आहे. ‘लोकशाही’ आणि ‘कायद्याचे राज्य’ हे परस्परावलंबी आहेत. कायद्याच्या राज्याशिवायच्या लोकशाहीमुळे फक्त अराजक माजते, असा गर्भित इशारा या लेखात देण्यात आला आहे. ‘झिन्हुआ’ या सरकारी वृत्तसंस्थेनेही या आंदोलनांवर जोरदार टीका केली आहे.

Story img Loader