मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेण्ट (एमक्यूएम) पक्षाने नॅशनल असेंब्ली मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याची मागणी केल्याने एमक्यूएम आणि पाकिस्तानच्या निवडणूक आयोगामध्ये निर्माण झालेला तिढा अद्यापही कायमच आहे.तथापि, आयोगाने केवळ ४३ मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याची तयारी दर्शविली आहे. निवडणुकीत मोठय़ा प्रमाणावर गैरप्रकार झाल्याच्या आणि मतदान केंद्रे विलंबाने सुरू करण्यात आल्याच्या तक्रारी आल्यानंतर आयोगाने या ४३ मतदान केंद्रांवरील मतदान थांबविण्याचे आदेश दिले होते.
त्यापूर्वी आयोगाने एमक्यूएम, तेहरिक-ए-इन्साफ पार्टी आणि सिंध प्रांतातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा केली. नॅशनल असेंब्लीच्या २५० क्रमांकाच्या मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याची मागणी करण्यात आल्याचे एमक्यूएमचे नेते फारूख सत्तार यांनी सांगितले. ज्या प्रकारे ४३ मतदान केंद्रांवर गैरप्रकार झाले तसेच प्रकार अन्य १४२ मतदान केंद्रांवरही झाल्याचे सत्तार म्हणाले.
या मतदारसंघातील काही मतदान केंद्रांवर मतपेटय़ा वेळेत पोहोचल्याच नाहीत. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी त्या पोहोचल्याच नाहीत. त्यामुळे सर्व मतदारांना फेरमतदानाचा अधिकार नाकारणे अयोग्य असल्याचे मतही सत्तार यांनी व्यक्त केले.
दरम्यान केवळ २५० क्रमांकाच्या मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण कराचीतच फेरमतदान घेण्याची आमची मागणी असल्याचे पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे नेते अरिफ अल्वी यांनी सांगितले. विविध वाहिन्यांवरून निवडणुकीत गैरप्रकार घडल्याची प्रकरणे प्रदर्शित करण्यात आली. त्यावरून संपूर्ण कराचीतच निवडणुका मोकळ्या वातावरणात पार पडलेल्या नसल्याचे स्पष्ट होते, असेही अल्वी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा