बांगलादेशातील कट्टरपंथी जमात ए इस्लामी संघटनेचा नेता दिलवर हुसेन सईदी (वय ७३) याला आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने १९७१ चा युद्धगुन्हेगार म्हणून फाशीची शिक्षा ठोठावल्याने बांगलादेशात गुरुवारपासून उसळलेल्या िहसाचारात ४६ जण मृत्युमुखी पडले आहेत.
या हिंसाचारानंतर बांगलादेशात निमलष्करी सीमारक्षक तैनात करण्यात आले असून, सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. देशभरात उसळलेल्या दंगलींमध्ये आतापर्यंत ४६ जण ठार झाले आहेत.
नागरी प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी आमचे सुरक्षारक्षक १५ जिल्ह्य़ांमध्ये तैनात करण्यात आले आहेत. बीजीबी (बॉर्डर गार्ड बांगलादेश)चे रक्षकही सज्ज ठेवण्यात आले असून त्यांना गरजेनुसार आदेश देण्यात येणार आहेत, असे या पथकाचे प्रमुख मेजर जन. अझिझ अहमद यांनी सांगितले.
जमात-ए-इस्लामीचा उपाध्यक्ष असलेला दिलवर हुसेन सईदी याला आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने फाशीची शिक्षा ठोठाविल्यानंतर गुरुवारी बांगलादेशमध्ये हिंसाचाराचा उद्रेक झाला.
पाकिस्तानसमवेत १९७१ मध्ये झालेल्या स्वातंत्र्ययुद्धात सईदी याच्यावर २० आरोप ठेवण्यात आले होते. त्यापैकी आठ गुन्ह्य़ांसाठी त्याला  दोषी ठरविण्यात आले असून, त्यामध्ये बलात्कार, सामूहिक हत्याकांड आणि अत्याचार या गुन्ह्य़ांचा समावेश आहे.
जमात-ए-इस्लामी आणि सईदी याच्या समर्थकांनी अधिक उग्र आंदोलन पुकारण्याचे ठरविल्याने सुरक्षा यंत्रणेला अधिक सज्जतेचे आदेश देण्यात आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी नमाजाच्या दिवशी जमातचे कार्यकर्ते मशिदींवर हल्ला चढवतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
जमातच्या कार्यकर्त्यांनी सईदी याला ठोठाविण्यात आलेल्या शिक्षेच्या विरोधात निदर्शने केली त्यावेळी त्यांची सुरक्षारक्षकांशी चकमक झडली. या कार्यकर्त्यांनी चार पोलिसांना बेदम मारहाण करून ठार केले, सत्तारूढ अवामी लीगचे कार्यालय पेटविले आणि रक्षकांकडील शस्त्रे हिसकावून घेतली.
आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने दोषी ठरविलेला सईदी हा तिसरा नेता आहे. तीन वर्षांपूर्वी या खटल्यांना सुरुवात झाली होती.

सईदीवरील आरोप
खून व सामूहिक हत्याकांडात ५० लोकांचा बळी घेतला, खेडी पेटविली, बलात्कार, लूटमार, अल्पसंख्याकांचे सक्तीने धर्मातर. १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचे हस्तक.

Story img Loader