मागील काही महिन्यांपासून थकबाकीसह महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढीच्या प्रतिक्षेत असलेल्या लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने आज मोठी भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रतिक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या निर्णयाची माहिती दिली. यापूर्वीच केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढीसह थकबाकी देण्यास संमती दिली होती. मात्र, निर्णय कधी होणार याकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलं होतं.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत महागाई भत्त्यात तब्बल ११ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महागाई भत्ता १७ टक्क्यांवरून २८ टक्क्यांवर गेला आहे. १ जुलैपासून वाढ लागू करण्यात आली आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे महागाई भत्त्याचे तीन हफ्ते प्रलंबित आहेत. सरकारने करोनामुळे महागाई भत्त्याला स्थगिती दिल्यानं हे हफ्ते प्रलंबित असून, सप्टेंबरपासून कर्मचाऱ्यांच्या हातात घसघशीत पगार येणार आहे.
केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात यापू्र्वी जुलै २०२० मध्ये ३ टक्के वाढ करण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी २०२० मध्ये महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. मात्र करोनानं शिरकाव केल्यानंतर केंद्र सरकारच्या महसूलावर मोठा परिणाम झाला. तिजोरीला फटका बसल्यानं केंद्राने केंद्र सरकारने महागाई भत्त्यातील चार टक्के वाढ जुलै २०२१ पर्यंत रोखली होती. करोना संकटामुळे केंद्र सरकारच्या सरकारी तिजोरीवर परिणाम झाला. महागाई भत्त्यात जुलै २०२१ नंतरच वाढ होईल, असंही सरकारने त्यावेळी म्हटलं होतं.
सप्टेंबरपासून मिळणार लाभ?
महागाई भत्ता आणि थकबाकीला १ जानेवारी २०२० पर्यंत रोखण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा १ जुलै २०२१ पर्यंत स्थगिती देण्यात आलेली असल्यानं सरकार आता काय निर्णय घेणार याकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलं होतं. मागील आठवड्यात याबद्दल निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारामुळे हा निर्णय लांबणीवर पडला होता. आज झालेल्या बैठकीत महागाई भत्ता १७ टक्क्यांवरून २८ टक्के करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या निर्णयाला मंजुरी दिल्याची खात्रीलायक माहिती असून, सप्टेंबरपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
…असे मिळू शकतात हफ्ते?
केंद्रीय कर्मचारी युनियनचे महासचिव शिव गोपाल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे “सरकार सप्टेंबर महिन्यात दोन महिन्यांच्या थकबाकीसह डीए देणार आहे. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या पगारात महागाई भत्ता (डीए) आणि डीआर दिला जाईल. सरकार केंद्रीय हफ्ते आणि निवृत्तीवेतनधारकांना तीन हफ्त्यांचे डीए आणि डीआर देईल. हे तीन हफ्ते जानेवारी २०२०, जुलै २०२० आणि जानेवारी २०२१ मधील असतील. तर जुलै आणि ऑगस्ट २०२१ साठी थकबाकीही देण्यात येणार असून, सप्टेंबरमध्ये ही रक्कम कर्मचाऱ्यांना दिली जाईल,” अशी माहिती मिश्रा यांनी काही दिवसांपूर्वीच दिली होती