एपी, बँकॉक

म्यानमारमधील ७.७ रिश्टर स्केलच्या भूकंपातील बळींची संख्या १६४४हून अधिक झाली आहे. भूकंपानंतर कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोकांचा मृत्यू झाला असून, मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

म्यानमारमधील प्रशासनाने सांगितले की, १६०० नागरिकांचा मृत्यू झाला असून, ३४०८ नागरिक जखमी झाले आहेत, तर १३९ जण बेपत्ता आहेत. अधिकृत आकडेवारी आणखी जमा केली जात आहे. भूकंपामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. मृतांचा आकडा मोठा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. म्यानमारमध्ये दीर्घकाळापासून नागरी संघर्ष सुरू असून, त्यामुळे अनेक समस्या येथे तयार झाल्या आहेत. भूकंपानंतरही काही भागांत लष्कराने हल्ले सुरू ठेवले आहेत. कायिन भागात भूकंपापेक्षा लष्कराच्या हल्ल्यांचाच तेथील नागरिकांना धोका आहे.

म्यानमार आणि थायलंडला शुक्रवारी दुपारी भूकंपाचा मोठा हादरा बसला. अनेक ठिकाणी इमारती जमीनदोस्त झाल्या. राजधानी नेपितॉ येथे वीजपुरवठा, टेलिफोन, इंटरनेट सेवा ठप्प आहे. कर्मचाऱ्यांनी काही ठिकाणी रस्ते नीट केले. मात्र, शहरातील काही भाग प्रशासनाने येण्या-जाण्यासाठी बंद केला आहे.

थायलंडमध्ये भूकंपामुळे बँकॉकला फटका बसला. बँकॉकमधील प्रशासनाने सांगितले की आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून, २६ जखमी झाले आहेत, तर ४७ बेपत्ता आहेत. यातील अनेक जण बांधकाम सुरू असलेल्या इमारतींमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत. बेपत्ता नागरिक जीवित असण्याची शक्यता मावळल्याचे चित्र आहे.

रशिया, चीनची मदत

चीनच्या युनान भागातून यांगून येथे शनिवारी ३७ जणांचे पथक आले. याखेरीज बीजिंग येथून ८२ जणांचे पथक येणार आहे. १६ जणांचे आपत्कालीन पथकही मदतीसाठी पाठविण्यात आले आहे. रशियाची आणीबाणी काळातील १२० जणांची पथके दोन विमानांनी म्यानमारला रवाना झाली आहेत. मलेशियातून ५० जण रविवारी मदतीसाठी येणार आहेत. दक्षिण कोरियाने २० लाख डॉलरची मदत जाहीर केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने ५० लाख डॉलरची मदत दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे.

पंतप्रधान मोदी यांची म्यानमारप्रमुखांशी चर्चा

नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी म्यानमारमधील लष्करशाही राजवटीचे प्रमुख जनरल मिन आँग लेंग यांच्याशी चर्चा केली. भूकंपामुळे झालेल्या नुकसानाचा सामना करण्यामध्ये भारत म्यानमारबरोबर असल्याचे मोदी म्हणाले. मोदींनी ‘एक्स’वर ही माहिती दिली. मोदी म्हणाले, ‘म्यानमारमधील भूकंपामुळे मृत्युमुखी पडलेल्यांबदद्लच्या वेदना जनरल लेंग यांच्याकडे व्यक्त केल्या. जवळचा मित्रदेश आणि शेजारी देश म्हणून म्यानमारमधील नागरिकांबरोबर भारत आहे. भारताने मदतीचे साहित्य आणि पथक म्यानमारला रवाना केले आहे.’

भारताकडून ‘ऑपरेशन ब्रह्म’

● भारताने शनिवारी म्यानमारमध्ये ‘ऑपरेशन ब्रह्म’अंतर्गत १५ टन बचावसाहित्य म्यानमारला रवाना केले.

● सी-१३० जे विमानाने भारताने हे साहित्य पाठविले. तंबू, झोपण्याचे सामान, ब्लँकेट, तत्काळ खाता येतील असे पदार्थ, सौर दिवे, जनरेटर, आवश्यक वैद्याकीय औषधे पाठविली आहेत.

● भारताचा म्यानमारमधील दूतावासही सक्रिय आहे.

● भारत राष्ट्रीय संकटकालीन प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) ८० जवानांनाही म्यानमारमध्ये पाठविणार आहे.