मध्य प्रदेशात सर्वाधिक २७ बळी, महाराष्ट्रात वीस दगावले

राखी चव्हाण, नागपूर</strong>

वाघांची संख्या जेवढय़ा झपाटय़ाने वाढत आहे, तेवढय़ाच वेगाने वाढणारी वाघांच्या मृत्यूची आकडेवारीदेखील चिंतेत भर घालणारी आहे. विशेष म्हणजे गस्ती पथक असतानाही वाघांचे मृत्यू अनेक दिवस उघडकीस न येणे हे अधिक चिंताजनक आहे. संपूर्ण भारताचा विचार केला तर २०१८ या वर्षांत १०० वाघ मृत्युमुखी पडले आहेत. यात २७ वाघांच्या मृत्यूसह मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर तर २० वाघांच्या मृत्यूसह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.

वाघांची संख्या पूर्वीच्या तुलनेत वाढत आहे कारण वाघांबद्दल होणारी जनजागृती. मात्र, त्या तुलनेत तृणभक्षी प्राण्यांची कमी होत जाणारी संख्या आणि जंगलातील अधिवासांचा ढासळणारा दर्जा  यावरही गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. मध्य भारतात वाघांसाठी अधिवास चांगला आहे, पण वाघांच्या शिकारीपेक्षाही तृणभक्षी प्राण्यांची संख्या कमी असणे, हा अधिक काळजीचा विषय आहे. येत्या काळात देशातील वाघांची संख्या दहा हजारापर्यंत पोहोचल्यास आश्चर्य वाटायला नको, असा आशावाद वन्यजीव वैज्ञानिक डॉ. उल्हास कारंथ यांनी वर्षभरापूर्वी नागपुरातील एका कार्यशाळेत व्यक्त केला. त्याच वेळी त्यांनी अधिवासाचा दर्जा आणि तृणभक्षी प्राण्यांवरही चिंता व्यक्त केली होती. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी सरासरी ६७ वाघांचा मृत्यू होतो. वाघांचे नैसर्गिक मृत्यू कमी आणि वीजप्रवाह, विषप्रयोग, रस्ते अपघात ही वाघांच्या मृत्यूमागील प्रमुख कारणे आहेत.

वाघांच्या संवर्धनाबाबतीत अग्रक्रमाने नाव घेतले जाणारे मध्य प्रदेश हे राज्य. मात्र, या राज्यातही आता वाघांच्या मृत्यूची आकडेवारी वाढत आहे. वाघांच्या संरक्षणातील त्यांची कामगिरी खालावत आहे. गेल्या पाच वर्षांत मध्य प्रदेशात एकूण ८९ वाघांचा मृत्यू झाला. त्यातील ११ मृत्यू हे वाघांच्या बछडय़ांचे होते. २०१८ या एका वर्षांत २७ वाघ या राज्यात मृत्युमुखी पडले. मध्य प्रदेशसारख्या व्याघ्र संवर्धनाबाबत आघाडीवर असणाऱ्या राज्यात वाघांच्या मृत्यूची आकडेवारी ही वन्यजीवप्रेमींसाठी धक्कादायक बाब आहे. २०१६ मध्ये वाघांच्या मृत्यूच्या आकडेवारीत महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा होता, पण आता तो दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. २०१८ मध्ये १०० तर २०१७ मध्ये ११५ वाघ मृत्युमुखी पडले होते. या वर्षी पुन्हा ही आकडेवारी वाढणार की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. वाघांचे अस्तित्व हे पर्यावरणासाठी आवश्यक आहे, पण त्यांचे संरक्षण हे मोठे आव्हान आहे. नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी वाघांना वाचवावेच लागणार आहे.

वाघांचे             मृत्यू

मध्य प्रदेश         २७

महाराष्ट्र             २०

कर्नाटक              १४

उत्तराखंड           ८

राजस्थान            ६

तमिळनाडू           ६

उत्तर प्रदेश          ६

केरळ                   ५

ओडिशा                २

आंध्र प्रदेश            २

आसाम                 १

छत्तीसगड           १

नागालँड               १

पश्चिम बंगाल      १

वाघांची संख्या वाढत आहे आणि जेव्हा मानवी वस्ती असलेल्या क्षेत्रात ते येतात, तेव्हा संघर्ष वाढतो. तृणभक्षी प्राण्यांपासून पीक वाचवण्यासाठी शेतकरी वीजप्रवाह सोडतो आणि कळतनकळत तृणभक्षी प्राण्यांचा मागावर असणारा वाघ मारला जातो. सिंचन प्रकल्पांमध्ये आणि जंगलालगतच्या रस्त्यांवर अपघातात ते मृत्युमुखी पडतात. जंगलालगतच्या शेतातील खुल्या विहिरीतदेखील ते पडतात. मध्य भारतात प्रामुख्याने या घटना घडतात. अशा वेळी खबरदारीच्या उपाययोजना (मेटिगेशन मेजर्स) अत्यावश्यक आहेत. संरक्षित आणि प्रादेशिक क्षेत्रातील वन्यजीवांच्या संरक्षणपद्धतीत फरक आहे. मात्र, संरक्षित क्षेत्रातून बाहेर पडल्यानंतरही त्यांना त्याच पद्धतीच्या संरक्षणाची गरज आहे. वाघांची संख्या वाढणार तशा या घटनांमध्येही वाढ होत जाणार आहे. त्यासाठी जनजागृती  हा एकच पर्याय आहे.

– मंदार पिंगळे, संवर्धन अधिकारी, सातपुडा फाऊंडेशन

Story img Loader