Queen Elizabeth II Death : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वयाच्या ९६ वर्षी निधन झालं. बंकिंगहम पॅलेसने याबाबत अधिकृतपणे माहिती दिली आहे. त्यांनी स्कॉटलंडमध्ये गुरुवारी (८ सप्टेंबर) अखेरचा श्वास घेतला. मागील बऱ्याच काळापासून त्यांची प्रकृती खराब होती आणि त्यांच्यावर वैद्यकीय उपचारही सुरू होते. मागील ७० वर्षांपासून त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या. १९५२ मध्ये त्या पदावर आल्या होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “२०१५ आणि २०१८ मध्ये झालेल्या ब्रिटनच्या माझ्या दौऱ्यात महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या भेटीच्या आठवणी अविस्मरणीय आहेत. मी त्यांचा दयाळूपणा कधीही विसरू शकणार नाही. एका भेटीत त्यांनी महात्मा गांधींनी त्यांच्या लग्नात दिलेला रुमाल दाखवला होता. ते माझ्या कायम लक्षात राहील.”
बंकिगहम पॅलेसने जारी केलेले प्रसिद्धीपत्रक
संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनिओ गटर्स म्हणाले, “महाराणी एलिझाबेथ द्वितीय संयुक्त राष्ट्राच्या खूप चांगल्या मित्र होत्या. त्यांनी न्यू यॉर्कच्या संयुक्त राष्ट्र मुख्यालयाला दोनदा भेट दिली होती. त्यांचा अनेक पर्यावरणीय आणि सामाजिक कामांमध्ये सहभाग होता. ग्लासगो येथे त्यांनी पर्यावरणीय बदलावरही भाष्य केलं होतं. त्यांच्या निधनाने मी दुःखी आहे.”
विशेष म्हणजे नुकतीच महाराणी एलिझाबेथ यांनी ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान लिज ट्रस यांची नियुक्ती केली होती. एलिझाबेथ द्वितीय यांच्या कार्यकाळात त्यांनी एकूण १५ पंतप्रधानांची नियुक्ती केली. यात विस्टन चर्चिल यांच्यापासून लिज ट्रस यांच्यापर्यंत अनेकांचा समावेश आहे.