एक्स्प्रेस वृत्त, नवी दिल्ली
कुनो अभयारण्यातील चित्त्यांची मृत्यूसंख्या आठवर पोहचली, त्यावेळी या प्रकल्पाचे व्यवस्थापन ज्यारितीने केले जाते त्याबद्दल दक्षिण आफ्रिकेतील आणि नामिबियातील तज्ज्ञांनी गंभीर चिंता व्यक्त केली होती, तसेच यापैकी काही मृत्यू टाळता आले असते याकडे लक्ष वेधले होते. मात्र गोपनीयता, नैपुण्याचा अभाव आणि गैरव्यवस्थापन हे त्यातील सर्वात मोठे अडथळे ठरले.
अयोग्य देखरेखीच्या कारणाने रेडिओ कॉलरमुळे झालेले संसर्ग लक्षातच न येणे, जंगलात सोडलेल्या चित्यांना- नियमांविरुद्ध – नियमितपणे तयार खाद्य देणे आणि चित्त्यांचे भक्ष्य असलेल्या कुनोतील प्राण्यांच्या संख्येत झालेली घट, अशा त्रुटींमुळे चित्ता प्रकल्पावर प्रश्नचिन्ह लागले असल्याचे ‘इंडियन एक्सप्रेस’ने केलेल्या तपासात आढळले आहे.भारतात येऊन पोहचल्यानंतर काही दिवस अलगीकरणात ठेवल्यानंतर चित्त्यांना मोठय़ा बंदिस्त आवारात सोडले जाते. चित्त्याने नियमितपणे शिकार करणे सुरू केल्यानंतर त्याला जंगलात मोकळे सोडण्यात येते. मात्र जंगलात सोडल्यानंतरही प्रकल्पाचे कर्मचारी त्यांना तयार खाद्य देत होते, अशी माहिती कुनोतील सूत्रांनी दिली.
एका मादी चित्त्याने अभयारण्याच्या सीमेजवळ वासराची शिकार केली आणि ती खाण्यास सुरुवात केली, तेव्हाच वाहन तिच्या खाद्यासह तेथे आले. तेव्हा तिने शिकार सोडून दिली, असे दोन प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.शिकारीच्या जागेत चित्त्यांना दीर्घकाळ भरवण्यात आल्यास त्यांना शिकारीसाठी प्रेरणा मिळत नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले. मात्र चित्त्यांचे भक्ष्य असलेल्या कुनोतील प्राण्यांच्या संख्येत घट झाल्यामुळे त्यांना खाद्य भरवण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण अधिकारी देतात.उच्चाधिकाऱ्यांसह कुनोतील कर्मचाऱ्यांना चित्त्यांवर देखरेख ठेवण्याचे शास्त्रीय प्रशिक्षण किंवा अनुभव नाही. त्यामुळेच ते त्यांच्या जीपमध्ये बसून, रेडिओ कॉलरचे संदेश मिळत असल्याबद्दल समाधान मानतात. मात्र या संदेशांत खंड पडत असताना त्यांनी चित्त्यांचे बारकाईने निरीक्षण करायला हवे होते, असे तज्ज्ञांनी सांगितले.
स्थलांतराचा विचार नाही – केंद्रीय वनमंत्री
मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानातून (केएनपी) चित्त्यांचे स्थलांतर करण्याची कोणतीही योजना नसल्याचे केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी स्पष्ट केले.यादव यांनी ग्वाल्हेरमध्ये पत्रकारांना सांगितले, की, चित्ते स्थलांतरित करण्याचे कोणतेही नियोजन नाही. भारतातील मोसमी पावसाळय़ामुळे नैसर्गिकरीत्या येणाऱ्या कीटकांचा चित्त्यांना झालेला प्रादुर्भाव आमच्या निदर्शनास आला आहे. या कीटक संसर्गामुळे दोन चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. आम्ही दक्षिण आफ्रिका आणि नामिबियातील तज्ज्ञांशी यासंदर्भात सल्लामसलत केली आहे. या प्रश्नी योग्य ते व्यवस्थापन करत आहोत. सर्व वन अधिकारी, पशुवैद्यकतज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी भरपूर मेहनत घेत आहेत. त्यामुळे हा ‘चित्ता प्रकल्प’ निश्चित यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.