उच्च जातीसाठी आरक्षित पिण्याच्या पाण्याच्या भांड्याला हात लावला म्हणून एका नऊ वर्षीय विद्यार्थ्याला शिक्षकाकडून बेदम मारहाण झाल्याचा प्रकार राजस्थानमध्ये घडला. मारहाणीनंतर या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, २४ दिवसांनंतर या मुलाचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमधील जलोर जिल्ह्यातील ही घटना आहे.

बेदम मारहाणीनंतर पीडित जखमी मुलाला जलोर आणि उदयपूरमधील रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, तेथे त्याने उपचाराला प्रतिसाद न दिल्याने अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

ही घटना २० जुलैला राजस्थानमधील सुराणा गावातील सरस्वती विद्या मंदीर या खासगी शाळेत झाली. इंदर मेघवाल या इयत्ता तिसरीमधील मुलाने एका मातीच्या भांड्यातील पाणी पिल्यानंतर छईल सिंह या शिक्षकाने या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली.

हेही वाचा : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुंडांची झाडाझडती ; पिस्तुल, काडतुस, तलवारीसह शस्त्रसाठा जप्त

इंदर मेघवालचे वडील देवराम यांनी केलेल्या आरोपांनुसार, आरोपी सिंह यांनी मुलाला बेदम मारहाण केली आणि जातीवाचक शिवीगाळही केली. मारहाणीत पीडित मुलाच्या कानांना गंभीर दुखापत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. शरीराच्या आतील जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला.

मुलाच्या मृत्यूनंतर आरोपी शिक्षकाविरोधात भारतीय दंडविधान कलम ३०२ (हत्या) आणि अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षकाला ताब्यात घेऊन पोलीस चौकशी करत आहेत. जलोरचे पोलीस अधीक्षक हर्ष वर्धन अग्रवाल यांनी पीडित मुलाच्या वडिलांनी केलेल्या आरोपांची खातरजमा सुरू असून त्याला अद्याप दुजोरा मिळाला नसल्याचं म्हटलं आहे.

Story img Loader