केरळमधील भाजपाच्या ओबीसी नेत्याच्या हत्येप्रकरणात १५ आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सर्व आरोपी बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेचे सदस्य होते. शनिवारी न्यायालयाने या १५ जणांवर दोषारोप ठेवले होते. त्यानंतर आज मावेलीक्कर जिल्हा न्यायालयाने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. २०२१ साली भाजपाचे नेते रंजीत श्रीनिवासन यांची हत्या झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, आठ आरोपी प्रत्यक्ष हत्या करण्यात सहभागी होते. तर इतर आरोपींनी या गुन्ह्यात मुख्य आरोपींना मदत केली होती. केरळमधील भाजपाचे ओबीसी विभागाचे नेते रंजीत श्रीनिवासन यांची १९ डिसेंब २०२१ रोजी राहत्या घरात निर्घृण हत्या करण्यात आली होती. अलाप्पुझा येथील राहत्या घरात कुटुंबियांसमोरच आरोपींनी रंजीत यांना ठार केले होते.

पीएफआय संघटनेवर २०२२ साली बंदी घालण्यात आली होती. अजमल, अनूप, मोहम्मद अस्लम, अब्दुल कलाम ऊर्फ सलाम, सफरुद्दीन, मन्शद जसीब राजा, नवाज, समीर, नझीर, अब्दुल कलाम, झाकीर हुसैन, शाजी, नैसम आणि शेरनास अश्रफ या १५ आरोपींना जिल्हा न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.

रंजीत यांच्या पत्नी लिशा यांनी या निर्णयानंतर समाधान व्यक्त केले. “हे फक्त एक हत्येचे प्रकरण नाही, तर दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण आहे. आमच्या डोळ्यादेखत माझ्या पतीवर हल्ला करण्यात आला आणि त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली”, असे लिशा यांनी सांगितले.

Story img Loader