Death Penalty for Raping and Killing : गेल्या काही दिवसांपासून देशभरात सातत्याने महिला अत्याचाराचे प्रकार समोर येत आहेत. त्यातच अल्पवयीन आणि चिमुकल्या मुलींचं लैंगिक शोषणाचे गुन्हे वाढले आहेत. शहरी, ग्रामीण अशा दोन्ही भागांत महिला सुरक्षित नसल्याचं सातत्यान सिद्ध होतंय. त्यातच, आता कर्नाटकातील बेळगावी विशेष जलदगती न्यायालयाने एका बलात्कारी आरोपीला थेट मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यात तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करून तिला पुरणाऱ्या ३२ वर्षीय व्यक्तीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
२७ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशात, बेळगावीच्या विशेष जलदगती न्यायालयाने हारुगेरी येथील कुरुबगोडी गावातील रहिवासी उद्दप्पा रामाप्पा गांगर याला फाशीची शिक्षा सुनावली. तसंच, त्याला ४५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गुन्हा २१ सप्टेंबर २०१७ रोजी घडला होता.
पोलिसांनी काय सांगितलं?
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “उद्दप्पाने तीन वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून उसाच्या शेतात नेऊन तिचे लैंगिक शोषण केले. नंतर त्याने मुलीच्या तोंडात माती टाकून तिची हत्या केली. त्याने तिचा मृतदेह डोक्यापासून पोटापर्यंत पुरला.”
मुलीच्या कुटुंबियांना मिळणार ३ लाख रुपयांची नुकसान भरपाई
मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली उद्दप्पाला अटक करण्यात आली. न्यायमूर्ती सीएम पुष्पलथ यांनी वैद्यकीय अहवालांसह २५ पुरावे तपासले. त्यांनी उद्दप्पाला दोषी ठरवले आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला मुलीच्या कुटुंबाला ३ लाख रुपयांची भरपाई देण्यास सांगितले.