२००० साली दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी मोहम्मद आरिफ ऊर्फ अश्फाकला सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. फाशीच्या शिक्षेविरोधात दाखल आरिफची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सरन्यायाधीश उदय लळीत आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठाने ही शिक्षा ठोठावली आहे.
पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा! महाराष्ट्रासाठी २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर
“इलेक्ट्रॉनिक नोंदी विचारात घेण्याची विनंती आम्ही मान्य केली होती. दरम्यान, आरिफ या प्रकरणात दोषी आढळला आहे. त्यामुळे त्याची पुनर्विचार याचिका फेटाळत आहोत”, असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे. २२ डिसेंबर २००० मध्ये लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्यात दोन जवानांसह तिघांचा मृत्यू झाला होता.
१० ऑगस्ट २०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आरिफची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. २००५ मध्ये सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेला आव्हान देणारी त्याची याचिकाही न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली होती. आरिफ मुळचा पाकिस्तानातील अबोटाबादमधील रहिवासी आहे. त्याने लाल किल्ल्यावर राजपुताना रायफल्सच्या सातव्या तुकडीवर अंदाधुंद गोळीबार केला होता.