नवी दिल्ली : अमेरिकी तरुणांमध्ये ‘कोविड-१९’नंतरच्या काळात तरुण व्यक्तींचा मृत्यूदर अपेक्षेपेक्षा अधिक असल्याचे एका संशोधनात आढळले आहे. ‘जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशनने (जेएएमए) नेटवर्क ओपन’मध्ये यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या संशोधकांनी १९९९ ते २०२३ या कालावधी मरण पावलेल्या २५ ते ४४ या वयोगटातील ३३ लाख व्यक्तींच्या मृत्यूचे विश्लेषण करून हा निष्कर्ष काढला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तरुणांचा मृत्यूदर वाढला असतानाच त्यांच्या मृत्यूची कारणे एकमेकांपासून बरीच भिन्न आहेत. त्यामध्ये अमली पदार्थ व मद्यामुळे ओढवणारे मृत्यू, हृदयविकार, मधुमेह, साखरेचे वाढलेले प्रमाण, पक्षघात, उच्च रक्तदाब, अतिचरबी यासारख्या विविध कारणांबरोबरच वाढत्या अपघाती मृत्यूंचाही समावेश आहे. त्यामुळे करोना महासाथीच्या सध्या होत असलेल्या परिणामांवर अधिक संशोधन करण्याची गरज असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. अमेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा’च्या संशोधकांनी या अभ्यासात सहभाग घेतला. करोना महासाथीदरम्यान तरुणांचा मृत्यूदर मोठ्या प्रमाणात वाढला होता आणि महासाथीनंतरही तो अपेक्षेपेक्षा जास्त राहिला आहे असे संशोधकांना अभ्यासात आढळले. याचा परिणाम लोकसांख्यिकीवर होण्याची शक्यता आहे असे संशोधकांनी नमूद केले.

तरुणांमधील मृत्यूदर कमी करण्यासाठी त्यांना अधिकाधिक पोषक आहार उपलब्ध करून देणे, सामाजिक सेवा योजना अधिक बळकट करणे आणि सार्वजनिक जीवनावर परिणाम करणाऱ्या उद्याोगांचे अधिक नियमन करणे असे काही उपाय अभ्यासकांनी सुचवले आहेत.

अमेरिकेत २०१०च्या सुमाराला तरुणांचा मृत्यूदर कमी व्हायला लागला होता, तो करोनापश्चात वाढला आहे. महासाथीपूर्वीच्या एका दशकभराची तुलना करता, २०२३ या वर्षात २५ ते ४४ या वयोगटातील मरण पावलेल्या तरुणांची संख्या तब्बल ७० टक्क्यांनी वाढल्याचे संशोधन अभ्यासात म्हटले आहे. त्यातही २०२३ची आकडेवारी २०१०च्या आकडेवारीपेक्षा २० टक्क्यांनी जास्त आहे. जगभरात करोना महासाथीला २०१९च्या अखेरीस सुरुवात झाली होती.

अचानक मृत्यूंचे वाढते प्रमाण

भारतामध्येही गेल्या काही वर्षांमध्ये तरुणांमध्ये अचानक मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. जिम्नॅशियममध्ये व्यायाम करताना, खेळ खेळताना हृदयविकाराच्या धक्क्याने तरुण मरण पावण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामध्ये निरोगी आणि स्वस्थ असलेल्या तरुणांचा समावेश दिसत असून त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

तरुणांमध्ये विविध कारणांमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढण्याची आम्हाला अपेक्षा नव्हती. ही कारणे अगदी वेगवेगळी आहेत. त्यामुळे ही पटकन उपाय सापडेल अशी साधी समस्या नाही, तर त्याचे स्वरूप अधिक व्यापक आहे.– एलिझाबेथ रिग्ले-फिल्ड, संशोधक, ‘युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा’

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death rates in young adults in america increases after corona zws