कर्नाटक उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. न्यायालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याच्या (पीआरओ) मोबाइल क्रमांकावर फोन करून ही धमकी देण्यात आली. तसेच धमकीचा संदेश व्हॉट्सॲपवरही पाठवण्यात आला. धमकीचा संदेश मिळाल्यानंतर बंगळुरू पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फोनवरून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाचे पीआरओ के मुरलीधर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, १२ जुलै रोजी संध्याकाळी सात वाजता त्यांना एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने मुरलीधर यांच्या कार्यालयीन व्हॉट्सॲप क्रमांकावरही धमकीचा संदेश पाठवला. ज्यामध्ये आरोपीनं पाकिस्तानमधील एबीएल बँकेचा (अलाईड बँक लिमिटेड) खाते क्रमांक पाठवून संबंधित खात्यावर ५० लाख रुपये जमा करण्याची धमकी दिली होती.
तत्काळ पैसे न पाठवल्यास उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना ठार मारले जाईल, असंही व्हॉटसॲप संदेशामध्ये म्हटलं होतं. धमकी मिळालेल्या सहा न्यायाधीशांमध्ये न्यायमूर्ती मोहम्मद नवाज, एचटी नरेंद्र प्रसाद, अशोक निजगन्नानवर, एचपी संदेश, के नटराजन आणि न्यायमूर्ती वीरप्पा आदींचा समावेश आहे.
हेही वाचा- मुंबईतील व्यावसायिकाला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकी, मागितली २० लाखांची खंडणी
आरोपीनं या धमकीचा संदेश हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषांमध्ये पाठवला होता. तसेच आरोपीनं तक्रारदार पीआरओ यांच्या व्हॉट्सॲपवर काही मोबाईल नंबर देखील पाठवले. संबंधित मोबाईल नंबर हे भारतातील आमच्या शूटरचे आहेत, असा दावाही फोनवरील व्यक्तीने केला. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिलं आहे.