उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवरून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीली देवरिया (उत्तर प्रदेश) पोलिसांनी ठाणे येथे जाऊन बेड्या ठोकल्या आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी (५ डिसेंबर) त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तो उत्तर प्रदेशमधील भदोही जिल्ह्यातील रहिवासी आहे. रुद्रपूर तालुक्यामधील फतेहपूर गावातील सामूहिक हत्याकांड प्रकरणी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दोन महिन्यांच्या सुनावणीनंतर तहसीलदार न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम ठेवत आरोपींचा अर्ज फेटाळाला होता. त्यामुळे या आरोपीने थेट उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
रुद्रपूर तहसीलदार न्यायालयाने उत्तर प्रदेश महसूल संहिता २००६ च्या कलम ६७ नुसार आरोपी प्रेमचंद याच्यावर कारवाईचे आदेश दिले होते. तसेच त्याच्या घरावर कारवाई केली जाणार होती. त्यानंतर प्रेमचंद याच्या बाजूने जिल्हा दंडाधिकारी न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली. परंतु, जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी ही याचिका फेटाळली. त्यामुळे संतापलेल्या अजित कुमार यादव (सध्या ठाणे वास्तव्य) या तरुणाने एक्सवरून थेट उत्तर प्रदेशच्या मुख्यमत्र्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. अजीतल्या सोशल मीडियाद्वारे माहिती मिळाली की, देवरिया प्रशासन आरोपी प्रेमचंदचं घर बुलडोझरच्या मदतीने उध्वस्त करणार आहे. त्यामुळे संतापलेल्या अजीतने मुख्यमंत्र्याना धमकी दिली.
दरम्यान, आरोपी महाराष्ट्रात मुंबईजवळच्या ठाणे शहरात लपून बसल्याची माहिती मिळताच देवरिया पोलिसांनी ठाणे पोलिसांच्या मदतीने अजीत कुमार यादव याला अटक केली. त्यानंतर पोलीस त्याला विमानाने गोरखपूरला घेऊन गेले. गोरखपूरचे पोलीस अधीक्षक संकल्प शर्मा म्हणाले ठाणे पोलिसांच्या मदतीने आम्ही आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत आता त्याची तुरुंगात रवानगी होईल.
हे ही वाचा >> योगी आदित्यनाथ यांच्यासह राम मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी, FIR दाखल
आरोपी अजीत यादव हा मूळचा भदोही जनपदमधील चौरा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या टिकैतपूरमधील रहिवासी आहे. कुटुंबासह तो सध्या कल्याणजवळच्या टिटवाळा परिसरात राहत होता. तसेच ठाण्यातल्या एका महाविद्यालयात बीएससी करत होता.