प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी याला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. तसंच, त्याच्याविरोधात खोटे आरोप केले जात असल्याचं त्याने म्हटलं आहे. त्याने आज एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर पोस्ट लिहून याबाबतची माहिती दिली. तसंच, तुम्ही एक ध्रुव राठी शांत केलात तर १००० नवीन ध्रुव राठी जन्माला येतील, असं तो म्हणाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ध्रुव राठी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मोदींविरोधात त्याने अनेक व्हिडिओ केले होते. तसंच, दिल्लीतील स्वाती मालिवाल प्रकरणीही त्याने व्हिडिओ केला होता. स्वाती मालिवाल यांच्याही समर्थनार्थ त्यांनी पोस्ट केली होती. त्यावरून स्वाती मालिवाल यांनाही धमकीचे फोन येत होते. आता ध्रुव राठीलाही जीवे मारण्याची धमकी मिळत आहे.

याबाबत तो एक्स पोस्टवर म्हणाला की, “माझ्यावर खोटे आरोप, रोज जीवे मारण्याच्या धमक्या, अमानवीय अपमान, माझी बदनामी करण्यासाठी मोहिमा सुरू आहेत. मला आता सवय झाली आहे. गंमत अशी आहे की, गुन्हेगार पीडित असल्याचं नाटक करत आहेत. या सगळ्यामागे कोण आहे हे सर्वांना माहीत आहे. त्यांना मला गप्प करायचे आहे. पण तसे होणार नाही. जर तुम्ही १ ध्रुव राठीला गप्प केले तर १००० नवीन उठतील.”

हेही वाचा >> ध्रुव राठी आणि ‘आप’वर स्वाती मालिवाल यांचा मोठा आरोप; म्हणाल्या, “बलात्कार आणि जीवे मारण्याची..”

कोण आहे ध्रुव राठी?

ध्रुव राठीने सुरुवातील ट्रॅव्हल व्लॉग सारखे व्हिडिओ तयार करून प्रसिद्धी मिळविली. त्यानंतर तो सामाजिक, राजकीय भाष्य करणारे व्हिडिओ करू लागला. १९९४ साली जन्मलेला ध्रुव राठी अवघ्या २९ वर्षांचा आहे. ध्रुव राठीचे कुटुंब मुळचे हरियाणामधील रोहतकचे असून ते सध्या जर्मनीत वास्तव्यास आहेत. ध्रुव राठीचे बालपण आणि शालेय शिक्षण दिल्लीत झाले. त्यानंतर पुढचे शिक्षण घेण्यासाठी ध्रुव जर्मनीत गेला. २०२१ मध्ये ध्रुवने ज्युलीशी लग्न केले. २०२२ साली दोघांनी पुन्हा एकदा भारतीय परंपरेनुसार लग्न केले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death threat to youtuber dhruv rathi x said on the post behind all this sgk