उत्तर भारतात रविवारपासून पडलेल्या मुसळधार पावसाच्या तसेच त्यामुळे आलेल्या पुरातील बळींची संख्या १५० झाली आहे. मृतांमध्ये महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्य़ातील एका महिलेचा समावेश आहे. सुमारे ५०० जण अजूनही बेपत्ता असून पुनर्वसनासाठी तसेच अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. भारतीय लष्कराचे, इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्सचे जवान तसेच भारतीय हवाई दलाची हेलिकॉप्टर्स उत्तराखंड आणि हिमाचलातील पूरग्रस्तांच्या सुटकेसाठी सक्रिय झाली आहेत. भारत सरकारतर्फे उत्तराखंड राज्यास १००० कोटी रुपयांची मदत जाहीर झाली असून १४५ कोटी रुपये तातडीने देण्यात आले आहेत.
भारतीय हवाई खात्यातर्फे मदतीसाठी सुमारे २२ हेलिकॉप्टर्स पाठविण्यात आली आहेत, तसेच लष्कराचे साडे पाच हजार जवान मदतकार्यात गुंतले आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन दलाचे ५४० प्रतिनिधी उत्तराखंड येथे धाडण्यात आले असून, लष्करातर्फे सुमारे ५०० जणांची सुटका करण्यात यश आले आहे, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.
उत्तराखंड राज्यावर कोसळलेल्या या अस्मानी संकटाचा सामना करण्यासाठी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारतर्फे आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पूरग्रस्त विभागाची हवाई पाहणी केली असून केंद्र सरकारतर्फे दोन्ही राज्यांतील लोकांसाठी अन्नपुरवठा आणि वैद्यकीय मदत पुरविण्यात येत आहे.
उत्तराखंडमधील मदतकार्यात अडचणी
सरकारी पातळीला मदतकार्य सुरू झाले असले, तरीही मदतकार्यात अनंत अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे तसेच रस्ते खचल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. हिंदुस्थान- तिबेट महामार्ग, खातिमा- पानिपत मार्ग, रुद्रप्रयाग येथील महामार्ग असे अनेक महत्त्वाचे रस्ते मधोमध खचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी पुरातून वाहून आलेल्या गाळाचे साम्राज्य पसरले आहे.
२२ जूनला पुन्हा एकदा प्रचंड पाऊस?
गेल्या २४ तासांत या प्रदेशातील पाऊस पूर्णपणे थांबला असल्याने परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न केला आहे. मात्र २२ जूनला पुन्हा एकदा प्रचंड पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
नुकसानीची मोजणी
पावसामुळे यमुनानगर, पानिपत आणि कर्नाल जिल्ह्य़ांत पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यांच्या महसूल खात्यांनी नुकसानीची मोजणी करण्यास सुरुवात केली असून, टप्प्याटप्प्याने हे काम करण्यात येणार आहे.
नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, गंगा, यमुना, शारदा, राप्ती, घागरा, बुऱ्ही राप्ती, रोहीन आणि कौनो नद्यांच्या जलपातळीत सातत्याने वाढ होत असून, शारदा नदीच्या पातळीत मंगळवारी एक मीटरने वाढ झाल्याचे वृत्त आहे.
महाराष्ट्रातर्फे १० कोटींचे अर्थसाहाय्य
उत्तराखंडमधील पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातर्फे १० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
विस्थापितांचे पुनर्वसन करण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी उत्तराखंड राज्यास ५ कोटींचे अर्थसाहाय्य घोषित केले आहे. पर्यटनावर ज्या राज्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे, तेथे बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चार पवित्र तीर्थक्षेत्रांचे झालेले नुकसान पाहावत नाही, असे स्पष्ट करीत ही मदत चौहान यांनी जाहीर केली. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी राज्य सरकारतर्फे २५ कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा