पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांताला मंगळवारी बसलेल्या भूकंपाच्या तडाख्यात आतापर्यंत ३५० जण मृत्युमुखी पडले आहेत. भूकंपाच्या तडाख्यामुळे घरे कोसळली असून दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का, याचा शोध घेऊन त्यांची सुटका करण्यासाठी सैनिक आणि मदतकार्य पथक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे.
या भूकंपाचा केंद्रबिंदू आवरन जिल्ह्य़ाजवळ असून तेथेच अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. बलुचिस्तान प्रांताला ७.७ रिक्टर स्केल इतक्या क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला. राष्ट्रीय आपत्कालीन प्राधिकरणाचे प्रमुख मेजर जन. मोहम्मद सईद अलीम यांनी या भूकंपात २७१ जण ठार व २४६ जण जखमी झाल्याचे क्वेट्टा येथे सांगितले. मात्र आवरन आणि केच जिल्ह्य़ात ३२७ मृतदेह मिळाल्याचे अन्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
बलुचिस्तान प्रांतातील अत्यंत दुर्गम भागात मदतकार्य पथक बुधवारी पोहोचले. खडकाळ प्रदेश आणि रस्त्यांची वानवा यामुळे तेथे पोहोचण्यास विलंब झाल्याचे सांगण्यात येत असून दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण गाडल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
भूकंपाच्या धक्क्य़ामुळे सहा जिल्ह्य़ांतील तीन लाखांहून अधिक जण बाधित झाले असून अनेकांना अन्नपाणी आणि निवाऱ्यापासून वंचित राहावे लागले आहे. उष्ण हवामानामुळे स्थिती अधिकच हलाखीची झाली आहे. भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळच्या आवरन आणि अन्य पाच जिल्ह्य़ांमध्ये बलुचिस्तानचे मुख्यमंत्री अब्दुल मलिक बलोच यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. लष्कराचे एक हजाराहून अधिक कर्मचारी आणि अन्य सेवांचे कर्मचारी मदतकार्य कार्यात व्यस्त असून आठ ठन अन्नधान्य आणि औषधे पाठविण्यात आली असून सहा हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आली आहेत.
कोसळलेल्या घरांच्या ढिगाऱ्याखालील अडकलेल्या बहुसंख्य लोकांना बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर लष्कराचे डॉक्टर आणि निमवैद्यकीय कर्मचारी उपचार करीत आहेत. आ़वरन परिसरातील हॉस्पिटल, शाळा आणि सरकारी इमारती यासह एकही इणारत या भूकंपाच्या तडाख्यातून बचावलेली नाही.