मागील काही दिवसांपासून इस्रायलकडून गाझा पट्टीवर सातत्याने बॉम्ब हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यात नवजात बालकांसह हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर इस्रायलने गाझा पट्टीची पूर्णपणे नाकाबंदी केली असून इंधन आणि वीज पुरवठा बंद केला आहे. यामुळे गाझा पट्टीतील वैद्यकीय सेवांवर मोठा परिणाम झाला आहे. अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांचा सुविधांअभावी मृत्यू होत आहे. दरम्यान, गाझामधील सर्वात मोठ्या रुग्णालयाच्या कंपाऊंडमध्ये लहान मुलांसह १७९ जणांना सामूहिक कबरीमध्ये दफन करण्यात आलं आहे.
अल शिफा रुग्णालयाचे प्रमुख मोहम्मद अबू सलमिया यांनी मंगळवारी सांगितलं की, या भागात अत्यंत दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्हाला मृत लोकांना सामूहिक कबरीत दफन करावं लागत आहे. रुग्णालयातील इंधन पुरवठा ठप्प झाल्याने अतिदक्षता विभागातील सात बालके आणि २९ रुग्णांना मृत्यू झाला. त्या सर्वांना सामूहिक कबरीत दफन करण्यात आलं.
हेही वाचा- “इस्रायली लष्कराकडून पॅलेस्टिनींवर बलात्कार झाले नव्हते का?” इतिहासाच्या शिक्षकाचे वादग्रस्त वक्तव्य
गाझामधील रुग्णालय परिसरात अनेक मृतदेह पडले आहेत. आता वीजही नाही. कुजणाऱ्या मृतदेहांची दुर्गंधी सर्वत्र पसरली आहे. अल शिफा रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्सशी संबंधित एका सर्जनने सांगितलं की, गाझामधील परिस्थिती अमानवी झाली आहे. इथे वीज, पाणी आणि अन्नही नाही.
हेही वाचा- “…तर ७०० रुग्णांचा मृत्यू होईल”; अमेरिकेच्या अध्यक्षांकडून चिंता व्यक्त, म्हणाले…
अल शिफा हे गाझा शहरातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. मागील आठवड्यात इस्रायली सैन्याने केलेल्या प्राणघातक नाकाबंदीनंतर ७२ तासांहून अधिक काळ रुग्णालयाचा जगापासून संपर्क तुटला होता. रुग्णालयाच्या गेटसमोर रणगाडे लावण्यात आले होते. हे रुग्णालय हमासच्या भूमिगत मुख्यालयाचा भाग असलेल्या बोगद्यांच्या जाळ्यावर उभारलं आहे, असा दावा इस्रायलने केला आहे. त्यामुळे इस्रायलकडून हे रुग्णालय लक्ष्य केलं जात आहे.